ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनी या योजनेचा लाभ सोडावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले होते. तसेच असे न केल्यास दंडासहित रक्कम वसूल केली जाईल असा इशारा भुजबळ यांनी दिला होता. आता दंड भरावा लागू नये म्हणून चार हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज दिला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेनुसार 18 ते 65 वयोगटातील गरजू महिलांच्या खात्यात महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जाणार होते. त्यानुसार जुलैमध्ये ही योजना सुरू झाली होती. डिसेंबरपर्यंत या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता सरकार या योजनेतील अपात्र महिलांला लाभ बंद करणार आहे.
यापुढे नियमबाह्य लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींकडून दंडासह वसुली करण्यात येईल
राज्य सरकारने अजूनतरी लाभार्थी महिलांचे अर्ज पडताळणी सुरू केलेले नाही. त्यापूर्वीच दंडाच्या भितीने चार हजार महिलांनी ही योजना नको म्हणून अर्ज केला आहे. दुसरीकडे काही महिलांनी या योजनेचे पैसे परत देण्यासही सुरुवात केली आह. पण या अपात्र महिलांकडून पैसे परत घेण्याच कुठलाही विचार नसल्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.