Published on
:
17 Nov 2024, 3:08 am
Updated on
:
17 Nov 2024, 3:08 am
मुंबई : Maharashtra Assembly Polls | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपणार आहे. त्यापूर्वी रविवारी महाविकास आघाडी, महायुतीसह सर्वच प्रमुख पक्षांत राजकीय प्रचाराचे युद्ध (वॉर) रंगणार आहे. हे प्रचार वॉर लक्षवेधी ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारतोफा रविवारी धडाडणार आहेत.
निवडणुकीतील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ५ नोव्हेंबरपासून राजकीय नेत्यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आदी सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांपासून ते त्यांच्या स्टार प्रचारकांची फौजच गेल्या दोन आठवड्यांपासून निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. एकूण १५८ राजकीय पक्ष निवडणूक आखाड्यात उतरले आहेत.
मुंबईत रविवारी मविआची सभा
महाविकास आघाडीची सभा मुंबईतील बीकेसी मैदानावर रविवारी होणार आहे. या सभेस शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संबोधित करणार आहेत. मुंबईतील ३६ जागांच्या दृष्टीने ही महत्त्वाची सभा आहे. वांद्रे पूर्वेत शिवसेना (उबाठा) चे वरुण सरदेसाई यांच्या प्रचाराच्यादृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. या सभेस काँग्रेसच्या वतीने मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत. गेल्या आठवड्यात बीकेसीमध्ये झालेल्या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार आदी नेतेमंडळी उपस्थित होती. रविवारच्या सभेसाठी आघाडीच्या नेत्यांनी जय्यत तयारी केली असून सभेसाठी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांऐवजी महाराष्ट्रातीलच नेते उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस प्रचारसभांचा धडाका
प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावणार आहेत. त्यामुळे आता प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या हाती केवळ दोन दिवस उरले आहेत. अधिकाधिक प्रचारसभांचा धडाका या दोन दिवसांत पाहायला मिळणार आहे. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडवणार असल्या तरी रविवार हा उमेदवारांसाठी विशेष दिवस असणार आहे. कार्यालयांना सुट्टी असल्यामुळे मतदारांना गाठण्यासाठी घरोघरी जाणे, चौकसभा, गृहनिर्माण संकुलांमधील मतदारांची भेट घेऊन एकगठ्ठा मतांची बेगमी करण्यासाठी उमेदवारांसाठी उद्याचा दिवस हा 'सुपरसंडे' ठरणार आहे.