संरक्षणमंत्री राजनाथ सिंहpudhari
Published on
:
17 Nov 2024, 4:57 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:57 am
देशातील गरिबी हटविण्याची भाषा काँग्रेस पक्षामार्फत करण्यात येत आहे. मात्र, देशात स्वातंत्र्यानंतर बहुतांश वेळा त्यांचेच शासन होते, तरीही त्यांना गरिबी हटवता आली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'मोहोब्बत की दुकान' उघडले आहे. मात्र, त्या दुकानात प्रेमाऐवजी फक्त द्वेषाचे सामान विकले जात असल्याची टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केली.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारासाठी सिंह पुण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर खासदार मेधा कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते. मी पुण्याच्या सर्व नागरिकांना नमस्कार करतो, असा मराठीतून संवाद साधत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. मराठीतून उच्चार व्यवस्थित न झाल्याचे लक्षात येताच मी प्रयत्न केला. प्रयत्न करणारे कधी पराभूत होत नाहीत, असेही ते सांगायला विसरले नाहीत.
गोळीबार मैदान येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी सिंह म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने कधीही सन्मान केला नाही. याउलट योजनाबध्दरीतीने त्यांना पराभूत करण्याचे काम त्यांनी केले. संविधानाच्या रक्षणासह जगातील डॉ. आंबेडकरांचा पदपर्श झालेली स्थळे जतन करण्याचे काम केंद्रातील भाजप सरकारने केले. ती स्थळे येणाऱ्या पिढीला पुढे प्रेरणा देण्याचे काम करणार आहेत. काँग्रेसच्या काळात १०३ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. आता तेच संविधान वाचविण्याची भाषणा करत आहेत. मोदी काळातही घटनादुरुस्ती झाली. मात्र, त्याची प्रक्रिया ही कायद्यानुसार पार पाडण्यात आली.
भाजपच्या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी सुरू झाल्याचे विरोधक बोलतात. मात्र, काँग्रेसनेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम केले. आत्तापर्यंतची सर्व चुकीची कामे काँग्रेसने केली. मात्र, त्यांनी यासाठीसुद्धा भाजपला जबाबदार धरले. काँग्रेस पक्ष ज्यांच्याबरोबर जातो, त्या पक्षांची अवस्था वाईट होताना दिसून येते. सध्या काँग्रेस ही शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाबरोबर आहे. त्यामुळे त्यांची अवस्था येत्या काळात वाईट होणार आहे. काँग्रेसने जात, पंथाच्या आधारावर देश वाटण्याचे काम केले. राजकारण हे सरकार नव्हे, तर देश बनविण्यासाठी केले पाहिजे. तर, काँग्रेसबरोबर जात उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सिध्दांताला मूठमाती देण्याचे काम केल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.