Published on
:
17 Nov 2024, 4:58 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:58 am
रायगड | विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. तर जाहीर प्रचारासाठी उमेदवारांकडे फक्त दोन उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र उमेदवारांचा प्रचार टिपेला पोहोचला आहे. दुर्गम वाडी-वस्त्यांवर पोहोचणे कठीण होत असले तरी मोठी मतदार संख्या असलेल्या गावांवर उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. मोठ्या सभांवरील खर्च टाळून गावबैठका आणि घरभेटींवर मतदारांनी भर दिला आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्यासह प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी गावभेटी, घरोघरी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. प्रचारासाठी कमी अवधी मिळाल्याने सुरुवातीच्या काळात मेळावे, प्रचारसभा, कोपरा सभा घेण्यात आल्या, तरीही काही गावांत पोहोचू न शकल्याने उमेदवारांनी आता मोठी मतसंख्या असलेली गावे दृष्टिक्षेपात आणण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावांमध्ये मतदारांची संख्या मोठी आहे. तसेच, ज्या ग्रामपंचायती मोठ्या सदस्य संख्येच्या आहेत, अशा ग्रामपंचायतींवर सर्व पक्षांनी मोर्चा वळवला आहे.
एकाच ठिकाणी अनेक मतदारांशी कमी वेळात संपर्क साधता येत असल्याने उमेदवारांना हा प्रचार सोयीचा पडत आहे. मोठी गावे व ग्रामपंचायतीमध्ये प्रचाराची तसेच उमेदवाराबाबत वातावरण निर्मितीही लवकर होते. आपली भूमिका जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवाराला सोयीचे होत असते. यामुळे अशा मोठ्या लोकसंख्येच्या व मतदार संख्या असलेल्या गावांवर उमेदवारांचे विशेष लक्ष आहे. अशा मोठ्या ग्रामपंचायतीमधूनच मताधिक्य मिळत असल्याने या ठिकाणी प्रचार सभा, बैठका, कोपरा सभा, प्रचारफेरी सुरू झाली आहे.
जिल्हयाच्या सर्वच भागात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामीण भागामध्ये वाड्या-वस्त्या या दुर्गम भागात असल्याने प्रचारासाठी दिवस वाया जातो, त्या तुलनेत मतदारांशी संपर्कही कमी प्रमाणात होतो; परंतु शहरी भागात मोठ्या मतदारांत व ग्रामपंचायतींमध्ये एकाच ठिकाणी जास्त मतदार संपर्कात येत असल्याने आता उमेदवारांनी अंतिम टप्प्यात मोठी लोकसंख्या असलेली गावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदार नोकरीनिमित्त जिल्हयाबाहेर आहेत. अशा मतदारांना मतदानाच्या दिवशी आपल्या गावी परत आणण्यासाठी कार्यकर्त्यांकडून नियोजन केले जात आहे. बाहेर गावी गेलेल्या मतदारांना प्रत्यक्ष अथवा त्यांच्या नातेवाईकांमार्फत संपर्क करून 20 नोव्हेंबरला मतदानासाठी येण्यासाठी व आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी गळ घातली जात आहे. त्यासाठी अशा मतदारांना येण्या-जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एकूण 20 नोव्हेंबर रोजी आपल्याला जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी उमेदवारांसह कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत करीत आहेत.
विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी होत आहे. तर जाहीर प्रचारासाठी उमेदवारांकडे फक्त दोन उरले आहेत. त्यामुळे सर्वत्र उमेदवारांचा प्रचार टिपेला पोहोचला आहे.