बुटीबोरी (MLA Sameer Meghe) : टाकळघाट हे सर्कलमधील मोठे व महत्त्वाचे गाव असून वानाडोंगरीप्रमाणेच याही गावाला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, अशी ग्रामवासियांची मागणी आहे. मात्र, टाकळघाट येथील राष्ट्रवादी पक्षाच्या विद्यमान सरपंचाच्या अडेलतट्टू धोरणामुळे या गावाचे नगर परिषदेत रूपांतर होत नसून विकासकामेही खोळंबलेली आहेत, अशी खंत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते आतिश उमरे (Atish Umre) यांनी व्यक्त केली.
हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजप महायुतीचे उमेदवार आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. टाकळघाट येथे आयोजित या सभेला देविका सागर मेघे, हरिचंद्र अवचट, पल्लवी कुकडकर, श्रावण जुनघरे, आरती कुकडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आतिश उमरे म्हणाले, २०१७ मध्ये वानाडोंगरी ग्रामपंचायत असताना भाजपच्या महानंदा पाटील या सरपंच होत्या. आ. समीर मेघे यांच्या विनंतीवरून महानंदा पाटील यांनी अडीच वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाही सरपंचपदाचा राजीनामा दिला व ग्रामपंचायत बरखास्त करून वानाडोंगरी हे गाव नगर परिषद व्हावे, यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर शासन अध्यादेश निघून वानाडोंगरीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला.
या बदलामुळे वानाडोंगरी नगर प्रशासनाचे उत्पन्न वाढले, शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळाला, मोठ्या प्रमाणात विकासाची अनेक कामे आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांना करता आली. आज टाकळघाटवासी आपल्या गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळावा म्हणून सतत मागणी करत आहेत. मात्र येथील सरपंचांच्या आडमुठे धोरणामुळे नगर परिषदेचा दर्जा मिळण्यास व पर्यायाने विकासकामातही खोळंबा निर्माण झाला आहे, असे मत आतिश उमरे यांनी मांडले. टाकळघाटच्या सरपंचांनी जनमताचा आदर करीत शासनाद्वारे गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळण्याबाबत ग्रामपंचायतीत ठराव घ्यावा व या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांकडे तो प्रस्ताव सोपवावा, जेणेकरून या भागाचा व्यापक विकास होईल आणि ग्रामवासियांनाही न्याय मिळेल, अशी मागणी या सभेत आतिश उमरे (Atish Umre) यांनी केली.
बोखारा येथील ग्रामपंचायत नगर पालिका होण्यास उत्सुक
बोखारा हे वाडी सर्कलमधील मोठे गाव असून आज गावाची लोकसंख्या २० हजाराहून अधिक आहे. बोखारावासी आपले गाव नगर पालिका व्हावे, यासाठी उत्सुक असून ग्रामपंचायतनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे प्रतिपादन सरपंच भाऊराव गोमासे यांनी बोखारा येथे भाजपचे उमेदवार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत केले.
नगर पालिकेसाठी आवश्यक असलेल्या बाबींची रीतसर पूर्तता करून व तसा ठराव घेऊन आम्ही आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या नेतृत्वात पुढील वाटचाल करणार आहोत, असे सरपंच गोमासे यांनी या सभेत जाहीर केले. सभेला माजी आमदार सागर मेघे, भाजपचे अध्यक्ष मोरेश्वर वऱ्हाडकर, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक, अर्जुन सिंह, ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र खोटे, सुखदेव बोन्डे, राघव मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.