‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’बाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. पडताळणी पूर्वी 4 हजार महिलांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली होती. अर्जांची पडताळणी झाल्यास आपण अपात्र ठरू या भीतीपोटी अनेक महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मागे घेत या योजनेचा लाभ थांबवण्यासाठी शासकीय कार्यालयात विनंती अर्ज दाखल केलेत. सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट पैसे मिळत होते, मात्र निवडणुकीनंतर या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची फेरतपासणी होणार याची चर्चा सुरू झाली. अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल, अशी भीती महिलांच्या मनात निर्माण झाली असून त्यामुळे अनेक महिलांनी लाडकी बहीणसाठी केलेल अर्ज मागे घेण्यास सुरूवात केली आहे.
यासंदर्भात आता महिला व बालविकास खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ” उत्पन्न जास्त झालं असेल किंवा दुचाकीपेक्षा अधिक वाहन त्यांच्याकडे चार चाकी वाहने असेल तर त्यांनी स्वत:हून लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरमध्ये काहींनी पैसे दिले. काहींनी या महिन्यातही द्यायला सुरुवात केली आहे. आम्ही सरकारी चलानच्या माध्यमातून ती संपूर्ण प्रक्रिया करून घेत आहे. मी लाडक्या बहिणींचे आभार मानेल. आपल्याला दोन वेळा लाभ आला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाहीत त्यावेळी त्यांनी पुढे येऊन राज्य सरकारचा निधी पात्र असण्याच्या पलिकडे त्यांच्याकडे आहे, तो परत करण्याचा निर्णय लाडक्या बहिणींनी घेतला आहे. त्या प्रामाणिक आहेत हे या उदाहरणातून पाहायला मिळत आहे” असं अदिती तटकरे म्हणाल्या.
बहिणींनी परत केलेल्या पैशाचं काय होणार?
आत्तापर्यंत अंदाजे 4 हजार महिलांनी अर्ज मागे घेतला. हा फक्त अंदाज आहे, तो आकडा अधिक असून शकतो. ही प्रोसेस कंटिन्यूअस सुरू राहणार आहे. डिसेंबरमध्ये 150 अर्ज आले होते. आता जानेवारीतही काही अर्ज आले आहेत. योजनेतून नाव मागे घेण्यासाठी हे अर्ज येत आहेत. जसे जसे अर्ज येतील तशी आम्ही प्रक्रिया करू. परिवहन विभाग आणि आयकर विभागाशी समन्वय साधून आम्ही पडताळणी सुरू केली आहे. ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. ती चालू राहील. त्यामुळे अर्ज मागे घेण्याचा आकडा कमी जास्त होईल.
या महिलांकडून परत आलेला निधि पुन्हा सरकारच्या तिजोरीत जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड आम्हाला तयार करून देतील आणि ते पैसे राज्याच्या तिजोरीत जाईल. आलेला पैसा सरकारी योजना आणि लोकोपयोगी आणि लोककल्याणकारी योजनेत वापरला जाणार आहे अशी मोठी घोषणा अदिती तटकरे यांनी केली. त्याबाबत अर्थ खात्याशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मी लाडक्या बहिणींना असं आवाहन करेन की त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम आली असतील तर इतर बहिणींप्रमाणे अर्ज मागे घेण्याचा अर्ज करावा,असंही त्यांनी नमूद केलं.
जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली,त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना रमहा 1500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत राज्यातील सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांना जुलै ते डिसेंबर अशा सहा महिन्यांचे एकूण 9 हजार रुपये देण्यात आले. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड भार पडणार असल्यामुळे या योजनेतील लाभार्थींची पडताळणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला व बालविकास विभागाला केल्या होत्या. त्यानुसार, या विभागाकडून आता अर्जांच्या पडताळणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. मात्र त्या पडताळणीत आपला अर्ज अपात्र ठरू शकतो या भीतीने आत्तापर्यंत सुमारे 4 हजार महिलांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.