Published on
:
04 Feb 2025, 3:38 am
Updated on
:
04 Feb 2025, 3:38 am
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत साधुग्रामच्या उभारणीसाठी तपोवन परिसरातील २६८ एकर जागेच्या संपादनाकरिता ५० टक्के रोख व ५० टक्के टीडीआर स्वरूपामध्ये मोबदला देण्याच्या दृष्टिकोनामधून फॉर्म्युला तयार करण्यात येत असून, त्यासोबतच प्रोत्साहनपर अर्थात इन्सेंटिव्ह टीडीआर देण्याचा प्रस्तावही तयार करण्याचे निर्देश राज्याचे गृहसचिव इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. सिंहस्थ कामांसाठी प्राधान्यक्रम तयार करून अत्यावश्यक स्वरूपाच्या कामांना तत्काळ मंजुरी घेऊन ती सुरू करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या.
कुंभमेळ्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. प्रयागराज येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा झाली. सिंहस्थात येणाऱ्या साधू-महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी तपोवनात साधुग्रामची उभारणी केली जाणार आहे. यंदा जवळपास ५०० हून अधिक आखाडे या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. तपोवन परिसरामध्ये साधुग्रामसाठी २८०.४६ एकर व संलग्न सुविधा करता ९७.०५ एकर असे एकूण ३७७.५१ एकर क्षेत्र आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी ९४.०७ एकर इतके क्षेत्र नाशिक महापालिकेच्या ताब्यात असून, साधारण २८३ एकर क्षेत्र संपादन करणे बाकी आहे. त्यापैकी १३ एकर क्षेत्रामध्ये जनार्दनस्वामी मठ, लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, लक्ष्मी गोशाळा असे सिंहस्थ संलग्न वापर अस्तित्वात आहे. तसेच अन्य १.५ एकर क्षेत्रामध्ये अभिन्यास मंजूर असल्यामुळे साधारणपणे २६८ एकर जागा तातडीने संपादित करणे आवश्यक आहे. या जागेवर गेल्या २४ वर्षांपासून आरक्षण असून, 'नो डेव्हलपमेंट झोन' असल्यामुळे कोणतेही काम जमीनमालकाला करता येत नाही. त्यामुळे संबंधित जागा कायमस्वरूपी महापालिकेने रोख भूसंपादनाद्वारे ताब्यात घ्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र तसे होत नसल्यामुळे आता जागामालक शेतकऱ्यांनी कुंभमेळ्यासाठी जागा देण्यास नकाराची भूमिका घेतली आहे. कुंभमेळ्याच्या तोंडावर हा वाद भेटण्याची शक्यता असल्याने कायमस्वरूपी भूसंपादनाकरिता गृहसचिव चहल यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
घाटविकाससह एसटीपी अद्यावतीकरण
सिंहस्थात गर्दी नियोजनाच्या दृष्टिकोनातून गोदाघाटांचा विस्तार केला जाणार असून, नदीप्रदूषण रोखण्यासाठी मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरणाची कामे सुरू केली जाणार असल्याची माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. कुंभमेळ्यासाठी कोणती कामे प्राधान्याने करायची याची यादी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.