Published on
:
04 Feb 2025, 4:19 am
Updated on
:
04 Feb 2025, 4:19 am
जिल्ह्यात वर्षभरात अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या १२१ जणांवर जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून, १५ तालुक्यांतून एकुण एक कोटी ७५ लाख ६३ हजार ६३९ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी एक कोटी १४ लाख ३२ हजार ८६९ रुपयांचा दंड वसूल झाला आहे, तर पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेकायदेशीररीत्या माती, मुरूम, दगड, वाळू, खडीचे उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाकडून कारवाई केली जाते. यासाठी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्याकडून भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांकडून नियमित कारवाई करण्यात येते. वर्षभरापूर्वी निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरातील अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. महाजनपूर, पिंपळगाव निपाणी आदी भागांतून माफियांची टोळी कार्यरत असून, बेकायदेशीररीत्या माती, मुरूम उचलण्यात येत असल्याचेही समोर आले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या निर्देशांनंतर भरारी पथकांची नियुक्ती करून कठोर कारवाई केली गेली.
अवैध गौण खनिजावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर तलाठी तसेच मंडलाधिकारी प्रतिनिधी म्हणून काम पाहात असतात. गौण खनिजावर लक्ष ठेवणे हे तलाठ्यांचे कर्तव्य असते. दर महिन्याला तहसील कार्यालयात गौण खनिजाचा अहवाल सादर करणे हे तलाठ्यांचे काम आहे. परवान्यानुसार व नमूद केलेल्या मुदतीतच गौण खनिजाचे उत्खनन होत आहे की नाही, हेही बघणे तलाठ्यांचे काम आहे. मागील वर्षभरात सर्वाधिक दंडाची रक्कम बागलाण, कळवण, सिन्नर, इगतपुरी भागांतून वसूल केली गेली. अद्यापही सहा लाख १३ हजार दंडाची रक्कम वसूल करणे प्रलंबित आहे. या दरम्यान गौण खनिज उत्खनन करणारी एकूण ४९ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
तालुकानिहाय वर्षभरात वाहनांवर झालेली कारवाईPudhari News Network
बागलाणमध्ये सर्वाधिक उत्खनन
वर्षभरात बागलाण तालुक्यात सर्वाधिक गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात आले. त्या खालोखाल कळवण, देवळा, मालेगाव या भागांत अवैध खनिज उत्खननाच्या घटना समोर आल्या. बागलाण तालुक्यात ९ लाख ५८ हजार ३५ दंड करण्यात आला, तर कळवणमध्ये ८ लाख ६७ हजार, देवळ्यात ७ लाख ७६ हजार अन मालेगावमध्ये ७ लाख १२ हजार दंड वसूल करण्यात आला.