सुट्या पैशांमुळे वाहक-प्रवाशांत होणारे वाद थांबलेPudhari News Network
Published on
:
04 Feb 2025, 5:21 am
Updated on
:
04 Feb 2025, 5:21 am
सटाणा : एसटीच्या दरवाढीनंतर प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणार्या त्रासाची परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. सुट्या पैशांवरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये यासाठी सरनाईक यांनी केलेल्या सूचनेनुसार एसटीने प्रवाशांना यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढण्याचे आवाहन केले आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून मागील काही दिवसांपासून यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. याबरोबरच महामंडळाने परिपत्रक काढून वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन रकमेमध्ये 100 रुपयापर्यंत सुटे पैसे देण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे वाहक आणि प्रवासी यांच्यातील सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यात यश आले आहे.
सुट्ट्या पैशांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वीच अग्रधन म्हणून सुटे पैसे देण्यात येत आहेत. प्रवाशांकडून जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने यूपीआयद्वारे तिकिटाचे पैसे द्यावेत यासाठीही जनजागृती केली जात आहे. प्रवाशांना त्याबाबत सूचना केल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत असून वादांचे प्रमाणही कमी झाले आहे.
राजेंद्र अहिरे, आगार व्यवस्थापक, सटाणा, नाशिक.
एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे अँड्रॉइड इलेक्ट्रॉनिक तिकीट इशू मशीन (एढखच) दिले आहेत. या मशीनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढले जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट काढताना या यूपीआय पेमेंटचा वापर केल्यास सुट्या पै शांमुळे होणारे वाद टाळता येतील. अशी सूचना सरनाईक यांनी केली होती. त्यानुसार महामंळाने यूपीआय पेमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणार्या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून मागील काही दिवसांच्या तुलनेमध्ये यूपीआय पेमेंटद्वारे मिळणारे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. तसेच एका परिपत्रकाद्वारे सूचना देऊन वाहकांना कर्तव्यावर जाण्यापूर्वी आग्रधन म्हणून सुटे पैसे देण्यात यावेत, अशा सूचना महामंडळाने स्थानिक प्रशासनास दिल्या आहेत. भविष्यात वाहक आणि प्रवासी यांच्यामध्ये सुट्या पैशावरून वाद उद्भवणार नाहीत, याची काळजी महामंडळाने घ्यावी अशी सूचना देखील परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे