कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची फसवणूकFile Photo
Published on
:
03 Dec 2024, 9:44 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:44 am
Pune News: व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एकाची सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तन्मय जाधव असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत किशोर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींची एका परिचितामार्फत आरोपी तन्मय जाधवशी ओळख झाली होती. फिर्यादीला व्यवसायासाठी चार कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. जाधवने व्यंकटेश्वरा एंटरप्रायजेस या खासगी वित्तीय संस्थेकडून 15 दिवसांत चार कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर फिर्यादींना त्याने रास्ता पेठेतील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले.
तेथे त्यांच्याबरोबर मुद्रांकावर करारनामा केला. कर्ज मंजुरीसाठी त्यांच्याकडून वेळोवेळी सहा लाख 87 हजार रुपये जाधवने घेतले. मात्र, त्यांना कर्ज दिले नाही. याबाबत व्यावसायिकाने त्याच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जे. आर. फडतरे हे पुढील तपास करत आहेत.