1999 मध्ये सहापैकी दोनच जागा काँग्रेसकडे गेल्या, तर भाजप-शिवसेनेने प्रत्येकी 2 जागा घेतल्या. 2004 मध्ये सहापैकी 3 जागा काँग्रेसला, तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने प्रत्येकी एक जागा घेतली. 2009 मध्ये आठपैकी 2 काँग्रेसला आणि 1 राष्ट्रवादीला, तर प्रत्येकी 2 जागा भाजप-शिवसेनेला मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील एकमेव जागा त्या निवडणुकीत नोंदवली.
पुण्याचा असा राजकीय इतिहास असताना 2024 उजाडले ते मोदी लाटेची द्वाही फिरवतच. इतिहासात प्रथमच भाजप-शिवसेना युतीतील पक्ष आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील पक्ष स्वतंत्र लढले. भाजप-शिवसेना एकमेकांविरुद्ध लढूनही आठपैकी 8 जागा भाजपने पटकावल्या आणि काँग्रेसची पाटी प्रथमच कोरी राहिली. ही मोदी लाट 2019 मध्येही कायम राहून आठपैकी 6 जागी भाजप, तर 2 जागी राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला. परिणामी, सलग दुसर्या वर्षी काँग्रेसची पाटी कोरी राहिली. अखेर दीड वर्षापूर्वी कसब्याच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला रवींद्र धंगेकर यांच्यामुळे एक जागा मिळाली.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा पुण्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पुण्यातील आठपैकी सहा जागा भाजपने लढवल्या आणि त्या जिंकल्या. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने उरलेल्या दोन जागा लढवल्या आणि त्यातली एक मिळवली. त्यामुळे पुण्यातील आठपैकी सात जागा महायुतीकडे गेल्या असून, एकच जागा शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली आहे. जिल्ह्याच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरी भागांवर आपलीच हुकमत असल्याचे भाजपने दाखवून दिले आहे.
पुण्यात भाजपचा सामना तीन ठिकाणी काँग्रेसशी, दोन ठिकाणी शरदचंद्र पवार काँग्रेसशी, तर एके ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेनेशी झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुण्यात दोन ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकले आणि त्यात एक जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने, तर एक जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. पुणे जिल्ह्यातल्या शहरी भागात भाजपने, तर ग्रामीण भागात अजित पवार यांच्या पक्षाने लढत द्यायची, अशी केलेली वाटणी कमालीची यशस्वी ठरली. या दोन्ही पक्षांची ताकद ज्या भागात आहे, त्या भागातील सर्वाधिक जागा त्या पक्षाला द्यायच्या, हे धोरण यशस्वी ठरले.