अभिनेता सैफ अली खान याला आज वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. निळी जीन्स, पांढरा शर्ट आणि डोळय़ाला गॉगल लावून सैफ हीरोसारखा रुग्णालयाबाहेर आला. त्यानंतर पत्नी करीना आणि मुलगी सारासह तो घरी परतला. पाच दिवसांनंतर सैफला डिस्चार्ज मिळाला असला तरी त्याचा व्यायाम, शूटिंग आणि काही हालचालींवर डॉक्टरांनी बंधने घातली आहेत.
चाकूहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफ अली खानवर पाच दिवसांपासून लीलावती रुग्णालयात उपचार चालू होते. त्याच्या शरीरावर हल्लेखोराने सहा वार केले होते. पहिल्या दिवशी त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. आज सहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयाबाहेर पडताच आपल्या कारमध्ये बसून तो तातडीने घरी रवाना झाला.
व्यायाम, शूटिंग बंद… हालचालींवरही मर्यादा
आपल्याला काहीच झाले नाही अशा आवेशात सैफ अली खान रुग्णालयाबाहेर आला असला तरी त्याच्या जखमा अजून पूर्णपणे भरलेल्या नाहीत. त्यामुळे त्याला पुढील किमान महिनाभर काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जखमांवर ताण येऊ नये यासाठी व्यायाम आणि शूटिंग करण्यास डॉक्टरांनी मनाई केली आहे. तसेच पाठीवरील जखम खोल असल्याने अवजड वस्तू उचलणे, खाली वाकणे अशा हालचाली टाळण्यासही डॉक्टरांनी सांगितले आहे.
इमारतीला सुरक्षा जाळय़ा, घराबाहेर सीसीटीव्ही
सैफ अली खान रुग्णालयात असतानाच तो राहत असलेल्या इमारतीमध्ये सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. इमारतीच्या बाल्कनींना सुरक्षा जाळय़ा लावण्यात आल्या. तसेच सैफच्या घराबाहेर उच्च दर्जाचा सीसीटीव्ही पॅमेरा लावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इमारतीमध्ये पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.