सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रम शाळाPudhari
Published on
:
03 Dec 2024, 9:55 am
Updated on
:
03 Dec 2024, 9:55 am
सुरगाणा | सुरगाणा तालुक्यातील अंबुपाडा बेडसे येथील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी व इतिहास या विषयाला शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्वरित शिक्षक उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बेडसे, आंबुपाडा, झगडपाडा, आंबोडे खोकरविहीर, केळावण या गावातील ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षक मिळावा म्हणून मागणी केली आहे. शाळेचे शैक्षणिक वर्ष चालू होऊन ७ महिने होऊनही अद्याप इंग्रजी, इतिहास या विषयाला शिक्षक उपलब्ध झालेला नाही.
मराठी विषय मुख्याध्यापक स्वतः शिकवत आहे. परंतु मुख्याध्यापकांनी आज पर्यंत सात महिन्यात मराठीचा एकच पाठ शिकविला आहे. शाळेला भेट दिली असता विद्यार्थ्यांनी आपल्याला तशी माहिती दिल्याचे बेडसे, आंबूपाडा, आंबोडे, खोकरविहीर, झगडपाडा, केळावण या गावातील पालक ग्रामस्थांनी सांगितली.
शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? दोन महिन्यांवरती परीक्षा आली असून काही शिकवलेच नाही तर विद्यार्थी पेपरात काय लिहणार असा प्रश्न आहे. मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊन अनुउत्तीर्ण झाल्यास वर्ष वाया जाऊ नये म्हणून याबाबतीत विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत आहेत. आज पावेतो काहीच शिकवले नसल्याचे विद्यार्थ्यांनी स्वतः पालकांना सांगितले . तसेच मुख्याध्यापक वेळेवरती शाळेवर हजर राहत नाही अशी तक्रारही पालकांची आहे.
मुख्याध्यापकांकडे मराठी विषय असल्याने विद्यार्थ्यांना सात महिन्यातून एक पाठ शिकवला आहे. तरी मराठी विषयांमध्ये कमी मार्क पडल्यास किंवा नापास झाल्यास याला मुख्याध्यापक जबाबदार राहतील असे पालकांनी खडसावले. इंग्रजी आणि इतिहास विषयाला शिक्षक नसल्याने या 2 विषयांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाने पास करून घ्यावे अशी मागणी पालकांनी केली आहे. मुख्यध्यापकांना या सगळ्यांचा जाब विचारुन गुन्हा दाखल करावा व शाळेवरून निलंबित करावे व चौकशी करून दोन दिवसात विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी शांतीलाल अलबाड, भास्कर अलबाड, रामदास वाघमारे, संजय पडेर, योगेश वाघमारे पालक, ग्रामस्थ यांनी केली आहे.