Published on
:
08 Feb 2025, 8:39 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन इंस्ट्रुमेंटल ‘स्नेह’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं निःशब्द प्रेमाची जाणीव करून देणारं आणि हृदयस्पर्शी संगीत अनुभव देणारं आहे. गाण्यात लोकप्रिय अभिनेत्री नम्रता गायकवाड आणि अभिनेता माधव देवचके यांची नवीन जोडी पाहायला मिळणार आहे. आदित्य बर्वे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे. हे गाणं अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर चित्रित करण्यात आलं आहे. फ्लॉसम एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार झालेल्या स्नेह या गाण्याची निर्माती अभिनेत्री नम्रता गायकवाड आहे. तर अमेश देशमुख यांनी सुरेल बासरी या गाण्यात सादर केली आहे.
नम्रता गायकवाड यांनी बाई गं, स्वराज्य, मराठी पाऊल पडते पुढे अशा मराठी चित्रपटांमध्ये तर रानबाजार या वेबसीरीजमध्ये आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. तर माधव देवचकेने हिंदी मालिका, मराठी चित्रपट, तसेच बिग बॉस मराठी रिॲलिटी शोमध्ये काम केले आहे.
अभिनेत्री नम्रता गायकवाड स्नेह गाण्याविषयी सांगते, “स्नेह हे मराठीतील पहिलंच गाणं आहे, जे इंस्ट्रुमेंटल गाणं आहे. शब्दाविणा तयार झालेल्या पहिल्याच गाण्याची निर्मिती मला करायला मिळाली हे माझं भाग्यच समजते. जिथे शब्द मौन होतात तिथे भावना बोलू लागतात आणि भावना थेट काळजाला भिडतात असा काहीसा अनुभव होता. प्रेक्षकांना गाण्याचा टीजर आणि गाणं खूप आवडतय, त्यामुळे खूप आनंद वाटतोय.”
संगीत दिग्दर्शक आदित्य बर्वे गाण्याच्या प्रोसेसविषयी सांगतो, “मला गिटार प्ले करत असताना एक ट्यून सुचली होती. मग मी तिच ट्यून वापरून बासरी आर्टिस्ट सोबत बसून मी ती ट्यून डेव्हलप केली आणि मग ठरवलं की, यावर एखादं इंस्ट्रुमेंटल गाणं करायचं. नम्रताला ही संकल्पना आवडली आणि मग या गाण्याचं चित्रीकरण आम्ही अलिबाग येथे केलं. शब्दाविणा गाणं करायचा वेगळा प्रयोग आहे आणि तो प्रेक्षकांना आवडेल, अशी मी आशा व्यक्त करतो.”