काँग्रेसच्या प्रचार सभेत बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या.Pudhari Photo
Published on
:
16 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
16 Nov 2024, 11:31 pm
मंगळवेढा : पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर वाढले. महागाई शिखरावर नेली. ‘अच्छे दिन’ दहा वर्षांत आलेच नाहीत. सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुखकारक झाले नाही. खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. नरेंद्र मोदी देशातील सगळ्यात खोटारडे पंतप्रधान आहेत, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आठवडा बाजार मैदानावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे बोलताना सिद्धरामय्या यांनी सांगितले की, स्व. भारत भालके या मतदारसंघात तीनवेळा आमदार होते. आता भगीरथ भालके यांना विजयी करा. महाराष्ट्रात काँग्रेसला आशीर्वाद द्या. काँग्रेसचे सरकार येईल आणि गोरगरिबांना चांगले दिवस येतील. काँग्रेस सर्वांना सोबतीने घेऊन जाणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष जाती, धर्म, भेद करत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणले. यात सगळ्या जातींना समान संधी मिळाली आहे. काँग्रेसचे धोरण तेच आहे. भाजप संविधान न मानणारा पक्ष आहे. नेहरू ते डॉ. मनमोहनसिंग यांच्यापर्यंत गोरगरिबांना जपणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजप केंद्रात सत्तेत आहे. पण गोरगरिबांचे कधीही हित पाहिले नाही.
देशात आलेली विषमता कमी करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. भाजप हा उच्चवर्णीय व श्रीमंत लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कोणत्याही परिस्थितीत महिला व गरिबांना जपले नाही. अदानी, अंबानी आशा भांडवलशाहीला मदत केली. देशातील शेतकरी संकटात आहेत. त्यांचासाठी एकही कार्यक्रम भाजपने केला नाही. शेतकरी कर्जमाफी कधीच केली नाही. काँग्रेसने 70 हजार कोटींची कर्जमाफी केल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. ‘ऑपरेशन लोटस’ राबवत मागच्या दाराने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडला. कोट्यवधी रुपये देऊन आमदार खरेदी केले, अशी टीका मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
खा. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आमचा उमेदवार हा ठेकेदार किंवा कारखानदार नाही. आपणाला शब्द दिला होता. उमेदवारी मिळवली आहे. भगीरथ भालके यांना आशीर्वाद द्या, असे आवाहन केले. भगीरथ भालके म्हणाले की, मराठा, धनगर आरक्षण प्रलंबित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार झाला. संत चोखामेळा, संत बसवेश्वर स्मारक झाले नाही. तालुक्यातील दडपशाही, गुंडगिरी, अडवणूक, पिळवणूक आहे. हे दिवस बदलण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आणावे लागेल, असे सांगितले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, एम. बी. पाटील, खा. प्रणिती शिंदे, बबनराव आवताडे, नंदकुमार पवार, तानाजी खरात, नितीन पाटील, राजाराम जगताप, मारुती वाकडे, सुरेश कोळेकर, भारत बेदरे, दयानंद सोनगे, जयश्री भालके आदी उपस्थित होते.