>> दीपक पवार
मुंबईचे मिनी कोकण असलेल्या भांडुपमध्ये गद्दार विरुद्ध निष्ठावंत असाच सामना रंगणार असून निष्ठावंतांचेच पारडे जड असल्याचे चित्र आहे. भांडुपमध्ये मराठी मतदार मोठय़ा प्रमाणावर असल्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 2014 पासून शिवसेनेनेच हा गड एकहाती राखला आहे. या वेळी शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या अशोक पाटील यांना महायुतीने मैदानात उतरवले आहे, परंतु अशोक पाटील यांच्या तुलनेत शिवसेनेचे उमेदवार रमेश कोरगावकर यांनी भांडुप विधानसभा मतदारसंघात दुपटीने कामे केली आहेत. या मराठमोळ्या मतदारसंघात विकासकामांच जननामत मिळेल आणि गद्दार घरी बसतील असे चित्र मतदारसंघात आहे.
भांडुप मतदारसंघ डोंगराळ भाग असल्याने रस्ते, पाणी आणि शौचालये अशा पायाभूत सोयीसुविधांचे मोठे आव्हान आहे. मात्र रमेश कोरगावकर यांनी त्यांच्या विकास निधीतून मोठी विकासकामे करून प्रत्येक आव्हानाचा धैर्याने मुकाबला केला. डोंगराळ भाग असल्याने येथे दरडी कोसळण्याच्या घटना नित्याच्याच. त्यामुळे पावसाळ्यात नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होते, परंतु आता या ठिकाणी संरक्षक भिंती बांधण्यात आल्याने दरडी कोसळण्याचा धोका कमी झाला आहे. अशी अनेक लोकोपयोगी कामे केल्याने कोरगावकर यांची लोकप्रियता वाढली आहे.
रस्ते रुंदीकरण आणि पुनर्विकास
भांडुपमध्ये अरुंद रस्ते, डोंगराळ भाग आणि झोपडपट्टय़ा असे चित्र असल्याने येथील रस्ते रुंदीकरण करून झोपडपट्टय़ांचा एसआरएमार्फत पुर्नविकासाची गरज आहे. त्यादृष्टीने कोरगावकर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. एनडी झोनचे स्पेशल डेव्हलपमेंट झोनमध्ये रूपांतर करून विविध विकासकामेही मार्गी लावण्यात येत आहेत.
भांडुप मराठमोळा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम सातत्याने केले गेले. विविध सामाजिक उपक्रम, लोकोपयोगी शिबिरे यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून खुले सभागृह उभारण्यात आले.
मोडकळीस आलेल्या सार्वजनिक शौचालयांचे पुनर्बांधकाम करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले. हा तलाव म्हणजे भांडुपची शान बनला आहे. तलावाच्या भिंतींवर शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारी विविध रूपे रेखाटण्यात आली आहेत.
उद्यान, मियावाकी उद्याने, स्मशानभूमी अशी अनेक विकासकामे करण्यात आली.
डोंगराळ भाग असल्याने पाणी कमी दाबाने येत होते. या जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.