अजित पवारच बारामती विधानसभा लढवणार:NCP नेते प्रफुल्ल पटेल यांची घोषणा; समर्थकांनी बारामतीत अडवला दादांचा ताफा

2 hours ago 1
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून आमच्या पक्षातर्फे कोण मैदानात उतरणार? याविषयी तर्कवितर्क लढवण्याची काहीच गरज नाही. तेथून अजित पवार हेच निवडणूक लढवणार हे मी जाहीर करतो, असे ते म्हणालेत. त्यांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामतीच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी जनतेला बारामती विधानसभा मतदार संघात मी देईल त्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या विधानामुळे ते यंदा निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत मिळत होते. याविषयी विविध तर्कवितर्क लढवले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी अजित पवार हेच बारामतीतून निवडणूक लढवणार असे स्पष्ट केले. अजितपवार हेच बारामतीचे उमेदवार असतील अजित पवार हेच बारामती विधानसभा मतदारसंघातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राहतील हे मी तुम्हाला अधिकृतपणे सांगतो. याविषयी कोणताही संभ्रम बाळगण्याची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मी स्वतः या एका जागेवरील उमेदवाराची घोषणा केली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा झाला होता पराभव उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती. पण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. यामुळे अजित पवार यंदाच्या विधानसभा निवडणुकीतून अंग काढून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला जात होता. पण प्रफुल्ल पटेल यांच्या या स्पष्टोक्तीमुळे बारामती विधानसभा निवणुकीतून अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असतील हे आता स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, अजित पवारांनीच बारामती मतदारसंघाची निवडणूक लढवावी यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी बारामती शहरातील सातव चौकात अजित पवारांचा ताफा अडवून धरला. यावेळी अजित पवारांनी आपल्याला पुढच्या कार्यक्रमाला जाऊ देण्याची विनंती केली. पण कार्यकर्त्यांनी अगोदर स्वतःची उमेदवारी जाहीर करा, नंतर बोला, असा आग्रह धरला. यावेळी त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही केली. जवळपास 15 ते 20 मिनिटे हा प्रकार सुरू होता. अखेर अजित पवारांनी गाडीबाहेर येत 'मी तुमच्या मनातील उमेदवार देतो', असे सांगत त्यांची समजूत काढली व तेथून पुढे निघाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article