डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर निर्णयांचा धडाका लावला. त्यांनी मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे तब्बल 78 निर्णय बदलले आहेत. अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर काढणे यांसारखे निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. तसेच यापुढे 20 जानेवारी हा दिवस अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन असेल असे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात आजाराचे चुकीचे व्यवस्थापन आणि जागतिक आरोग्य संघटना तातडीने सुधारणा राबवण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ट्रम्प यांनी ठेवला आहे. याशिवाय आरोग्य संघटना अमेरिकेकडून जास्त आणि चीनकडून कमी पैसे घेत असल्याचा दावादेखील ट्रम्प यांनी केला.
अमेरिकेचे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यापूर्वी जे. डी. व्हान्स यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. 40 वर्षीय व्हान्स हे अमेरिकेचे सर्वात तरुण उपराष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. जे. डी. व्हान्स यांची पत्नी उषा ही हिंदुस्थानी वंशाची असून दोघे तीन मुलांचे पालक आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जन्मताच अमेरिकेचे नागरिकत्व बहाल करणारा कायदा रद्द करण्याची घोषणा केली. कॅपिटल हिंसाचारामधील दोषींना माफी, अवैध स्थलांतरितांना बाहेर काढणे, मेक्सिको सीमेवर आणीबाणीची घोषणा, टिकटॉकवरील बंदी तूर्तास थांबवली, अमेरिका सरकारसाठी पुरुष आणि महिला असे दोनच लिंग असतील, पनामा कालवा परत घेणार, गल्फ ऑफ मेक्सिकोचे नाव बदलले, जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर, इतर देशांवर शुल्क लादण्याची घोषणा, अमेरिकेत इलेक्ट्रिक वाहनांची गरज नाही, मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची घोषणा, विदेशी शत्रू कायदा 1978 लागू करणार आणि क्युबाचा पुन्हा एकदा दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत समावेश असे मोठे निर्णय ट्रम्प यांनी जाहीर केले.