विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार मारत आपणच किंग असल्याचे सिद्ध केले.Pudhari Photo
Published on
:
24 Nov 2024, 1:16 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:16 am
दहिवडी : माण विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी विजयाचा चौकार मारत आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. जयकुमार गोरे यांनी 49 हजार 675 मताधिक्य मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आ. जयकुमार गोरे यांना 1लाख 50 हजार 24 मते मिळाली. तर प्रभाकर घार्गे यांना 1 लाख 346 मते मिळाली. उर्वरित 19 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. माण व खटाव तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांना आ. जयकुमार गोरे यांनी धोबीपछाड दिली.
दहिवडी येथील शासकीय गोदाम येथे बुधवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण वीस फेर्यांमध्ये मतमोजणी पार पडली. पोस्टल मतांसाठी वेगळे वीस टेबल मांडण्यात आले होते. त्यापैकी 14 टेबलवर पोस्टल 3840 मताची मोजणी झाली. यापैकी आ. गोरे यांना 1826 मते मिळाली तर प्रभाकर घार्गे यांना 1637 मते मिळाली. टपाली मतदानांमध्येही गोरे यांनी 197 मताधिक्य मिळवले. या निवडणुकीमध्ये एकूण 21 उमेदवार रिंगणात होते. यापैकी खरी लढत महायुतीचे आ. जयकुमार गोरे व महाविकास आघाडीतून प्रभाकर घार्गे यांच्यामध्ये झाली. सुरुवातीस चुरशीची वाटणारी निवडणूक मात्र शेवटी एकतर्फी झाली. 20 फेर्यांपैकी फक्त 19 व्या फेरीतच घार्गे यांना 123 मतांचे लीड मिळाले. बाकी सर्व फेर्यांमध्ये गोरेंनी दणदणीत आघाडी घेत घार्गे यांना मोठ्या मताधिक्याने चितपट करत विजयाचा एकतर्फी चौकार लगावला.
पहिल्या फेरीमध्ये आमदार गोरे यांना 6880 तर घार्गे यांना 3574 मते मिळाली. पहिल्या फेरीत गोरे यांना 3088 मताची आघाडी मिळाली. त्यानंतर एकूण झालेल्या 20 फेर्यात प्रत्येक फेरीला गोरे यांची आघाडी वाढत गेली. त्यामुळे आ. जयकुमार गोरे यांचा 49 हजार 675 एवढ्या मोठ्या मताधिक्याने एकतर्फी दणदणीत विजय झाला.
सुरुवातीला माण तालुक्यातील मोजणी करण्यात आली. पहिल्या बारा फेरीत माण मधून आमदार गोरे यांनी 41 हजारहून जास्त मताधिक्याची आघाडी घेतली. त्यानंतर खटाव तालुक्यातील मतांमध्येही आ. गोरे यांना आठ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले. प्रभाकर घार्गे यांना त्यांच्या हक्काच्या खटाव तालुक्यात ही मताधिक्य मिळवता आले नाही. प्रभाकर घार्गे यांना प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे, मनोज पोळ यांच्यासह अनेकांची साथ मिळाली. परंतु कोणालाही आपापल्या गटातही मताधिक्य देता आले नाही. अनिल देसाई व अभयसिंह जगताप दोघेही वरकुटे मलवडी या गावातील आहेत. परंतु त्यांच्या गावातही आ. गोरे यांनी 340 मतांचे मताधिक्य मिळवले. प्रभाकर देशमुख हे आपल्या लोधवडे गावात 769 मतांचे लीड प्रभाकर घार्गे यांना देण्यात यशस्वी झाले. परंतु त्यांना त्यांच्या गोंदवले गटात प्रभाकर घार्गे यांना मताधिक्य देता आले नाही. सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या साथीने आ. गोरे यांनी गोंदवले गटात बाजी मारली.
मार्डी गटाचे नेते व स्व.सदाशिवराव पोळ यांचे सुपुत्र मनोज पोळ यांनी त्यांच्या मार्डी गावात प्रभाकर घार्गे यांना 177 मतांचे मताधिक्य दिले. परंतु त्यांना त्यांच्या मार्डी गटात मताधिक्य देता आले नाही. त्यांचे बंधू डॉ. संदीप पोळ यांनी मात्र भाजपमध्ये असल्याने व मार्डी गटात आ. गोरे यांनी केलेल्या विकासकामांना जनतेने प्राधान्य देत मार्डी गटात ही मोठे मताधिक्य दिले. जयकुमार गोरे यांच्या हक्काच्या आंधळी गटाने व बिदाल गटाने आ. जयकुमार गोरे यांना मोठे मताधिक्य दिले.
खटाव तालुक्यातील प्रभाकर घार्गे हे उमेदवार असतानाही जयकुमार गोरे यांनी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे यांच्या साथीने व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या साथीने मोठी खिंड लढवत आठ हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून घार्गे यांना मोठा हादरा दिला. प्रभाकर घार्गे हे त्यांच्या हक्काच्या खटाव तालुक्यातून मोठे मताधिक्य घेतील अशी चर्चा व परिस्थिती होती. परंतु आ. गोरे यांना कार्यकर्त्यांची मिळालेली साथ त्यांचे बंधू अंकुश गोरे, शेखर गोरे यांनी गनिमी काव्याने मते काढली. खटाव तालुक्यातील जनतेने ही भारतीय जनता पक्षाने केलेल्या विकासकामांना व पाणी योजनांच्या कामांना प्राधान्य दिले.