कराड : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच कमळ उमलले आहे. तब्बल 43 हजार 691 मताधिक्याने मनोजदादा घोरपडे येथून विजयी झाले आहेत. आ.बाळासाहेब पाटील यांना एकूण 90 हजार 935 तर मनोजदादा घोरपडे यांना 1 लाख 34 हजार 626 मते मिळाली.
पहिल्या फेरीपासून मनोजदादा घोरपडे यांनी मतदानात आघाडी घेतली होती. ती शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. प्रत्येक फेरीत मनोजदादा घोरपडे यांना दीड दोन हजारांचे मताधिक्य मिळत गेले. काही फेर्यात तर त्यांना चार साडेचार हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. या मतदार संघात कराड तालुक्यातील 94 गावे, खटाव तालुक्यातील 26, कोरेगाव तालुक्यातील 36 व सातारा तालुक्यातील 38 गावांचा समावेश आहे. सर्वच तालुक्यातील जनतेने मनोजदादा घोरपडे यांच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले. मांडवे, पाडळी, निनाम, नागठाणे, सासपडे, पाल, अतित, मत्यापूर, वडगाव उंब्रज, इंदोली, काशिळ, वाठार किरोली, रहिमतपूर, नागझरी, हणबरवाडी, मसूर, कोणेगाव, नडशी, कोर्टी, उंब्रज, बेलवडे हवेली, कोपर्डे हवेली, विरवडे, पुसेसावळी, बनवडी, हजारमाची आदी सर्वच मोठ्या गावांनी मनोजदादा घोरपडे यांना भरभरून मतदान केल्याचे दिसून येत आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. आ.बाळासाहेब पाटील या मतदार संघाचे नेतृत्व करत आहेत. 25 वर्षांनंतर भाजपच्या मनोजदादा घोरपडे यांनी या मतदार संघात जोरदार मुसंडी मारत आ.पाटील यांना पराभवाची धूळ चारली. पहिल्या फेरीपासून मनोजदादा घोरपडे यांनी मतदानात आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली. गेल्या काही वर्षांत मनोजदादा घारपडे यांनी मतदार संघ बांधण्यात लक्ष घातले होते. शिवाय शासनाच्या योजना गाव वाडीवस्तीवर पोहचवल्या होत्या. लाडक्या बहिणींनी हात दिला. मनोजदादा घोरपडे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत मतदार संघात राबवलेले आरोग्यविषयक उपक्रम व महिलांसाठी आयोजित केलेले कार्यक्रम याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यांना विजयश्री मिळाली आहे. याशिवाय भाजपने या मतदार संघात विकासकामांसाठी भरीव निधी दिला होता. त्याचाही परिणाम निकालात दिसून आला.
पंचविसाव्या फेरीअखेर मनोजदादा घोरपडे यांना 1 लाख 30 हजार 805 मते मिळाली तर आ.बाळासाहेब पाटील यांना 88 हजार 106 मते मिळाली. 42 हजार 699 मतांनी आघाडी मनोजदादा घोरपडे यांना मिळाली. शेवटच्या सव्वीसाव्या फेरीत बाळासाहेब पाटील यांना 1708 तर मनोजदादा घोरपडे यांना 2526 मते मिळाली. पोस्टलच्या मतांमध्येही घोरपडे यांनी आघाडी घेतली. त्यांना 1261 मते मिळाली तर आ.पाटील यांना 1121 मते मिळाली. 1 लाख 35 हजार 626 एवढ्या दणदणीत मतांनी मनोजदादा घोरपडे विजयी झाले. छोटे पक्ष व अपक्षांचा सुपडा साफ झाला. कराड उत्तर मतदार संघात तेवीसाव्या फेरीत आ.बाळासाहेब पाटील यांना केवळ आठ मतांची आघाडी मिळाली. उर्वरीत सर्व फेर्यांमध्ये मनोजदादा घोरपडे यांनी दीड ते दोन हजार मतांची आघाडी घेतली आहे. काही फेर्यांमध्ये चार ते साडेचार हजारांपर्यंत आघाडी घेतली. लहान पक्ष व अपक्षांचा काही टिकाव लागला नाही. बहुतेक उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.