आ. शिवेंद्रराजेंचा विक्रमी दिग्विजय

2 hours ago 1

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघावर शिवेंद्रराजेंचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.Pudhari Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

24 Nov 2024, 1:29 am

Updated on

24 Nov 2024, 1:29 am

सातारा : सातारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम यांचा तब्बल 1 लाख 42 हजार 124 मतांनी पराभव केला. सातारा-जावली विधानसभा मतदारसंघावर शिवेंद्रराजेंचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. शिवेंद्रराजेंनी दणदणीत विजय मिळवून पंचकार ठोकत विधानसभेत एन्ट्री केली. सातारा-जावली मतदारसंघात त्यांनी कमळ फुलवले आणि रूजवले. राजा असूनही शिवेंद्रराजे लोकांमध्ये राहिले तसेच त्यांना खा. श्री. छ. उदयनराजेंची साथ लाभल्याने त्यांना राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे मताधिक्क्य मिळाले. आ. शिवेंद्रराजे यांच्या लिडचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी सकाळ-पासूनच जल्लोष सुरु केला. दुपारी आ. शिवेंद्रराजे यांच्या हस्ते पोवईनाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर जल्लोषाला एकच उधाण आले.

बदलत्या राजकीय घडोमोडींमुळे राज्याच्या राजकारणात सातारा हा केंद्रबिंदू बनला होता. त्यामुळे सातारा-जावली विधानसभेच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे आ. शिवेंद्रराजे भोसले, शिवसेना ठाकरे गटाचे अमित कदम, मिलिंद कांबळे (बसपा), बबन करडे (वंचित बहुजन आघाडी), शिवाजी माने (रासप), डॉ. अभिजीत बिचुकले (अपक्ष), गणेश जगताप (अपक्ष) व कृष्णा पाटील (अपक्ष) हे आठ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सातारा एमआयडीसीतील डीएमओ गोडावूनमधील मतमोजणी केंद्रात सकाळी 8 वाजता सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निरीक्षक वंदना वैद्य यांच्या उपस्थितीत मतमोजणीस सुरूवात झाली. यावेळी सातारा तहसीलदार नागेश गायकवाड, जावली तहसीलदार हणमंतराव कोळेकर, सातारा तालुका भूमि अभिलेख उपअधीक्षक तुषार पाटील, सातारा मुख्याधिकारी अभिजीत बापट प्रमुख उपस्थित होते.

मतमोजणी सुरू झाल्यावर अर्ध्याच तासात पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांना 4 हजार 314 मते तर अमित कदम यांना 1 हजार 62 मते मिळाली. आ. शिवेंद्रराजेंना पहिल्या फेरीत 3 हजार 252 मतांचे लीड मिळाले. दुसर्‍या फेरीत आ. शिवेंद्रराजे यांना 11 हजार 15 तर अमित कदम यांना 2 हजार 402 मते मिळाली. आ. शिवेंद्रराजे यांना 8 हजार 613 मतांचे लीड मिळाले. तिसर्‍या फेरीत आ. शिवेंद्रराजे यांना 16 हजार 432 मते तर अमित कदम यांना 3 हजार 701 मते मिळाली. आ. शिवेंद्रराजेंना 12 हजार 731 मतांचे मताधिक्य मिळाले. आ. शिवेंद्रराजे भोसले हे पहिल्यापासूनच लीडवर राहिले.

मतमोजणीच्या अखेरच्या 24 व्या फेरीपर्यंत आ. शिवेंद्रराजेंचे मताधिक्य अमित कदम कमी करू शकले नाहीत. पोस्टल मतदानात आ. शिवेंद्रराजे यांना 1 हजार 787 मते तर अमित कदम यांना 483 मते मिळाली. या मतदानातही आ. शिवेंद्रराजे आघाडीवर राहिले. सातारा विधानसभा मतदारसंघात प्रत्यक्षात शिवेंद्रराजे भोसले व अमित कदम यांच्यातच लढत झाली. शिवेंद्रराजे भोसले यांना 1 लाख 76 हजार 849 तर अमित कदम यांना 34 हजार 725 मते मिळाली. आ. शिवेंद्रराजेंनी 1 लाख 42 हजार 124 मतांनी दणदणीत विजय मिळवत सातारा-जावलीवर पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले.

सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील लढत प्रचारावेळी उत्कंठावर्धक बनली होती. या मतदारसंघावर शिवेंद्रराजेंंचा पगडा असल्यामुळे अमित कदम त्यांना कितपत झुंज देणार याची उत्सुकता होती. शिवेंद्रराजेेंच्या विरोधात बरेच रान उठवण्यात आले. मात्र, शिवेंद्रराजेंनी जोरदार प्रचारयंत्रणा राबवली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी झंझावात उभा केला. दोघांचे मनोमीलन झाल्याने त्याचा फायदाही शिवेंद्रराजेंंना झाला. उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रराजेंच्या नगर विकास आघाडीने एकत्र काम केले. त्यामुळेच शिवेंद्रराजेंनी सातारा जावली विधानसभा मतदारसंघात पंचकार ठोकला.

या निकालाने शिवेंद्रराजेंचा मतदारसंघावर असलेला करिष्मा दिसून आला. या निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याची राजकीय सूत्रे शिवेंद्रराजेंच्या हाती येण्याची शक्यता आहे. शिवेंद्रराजेंनी ज्या पद्धतीने प्रचारयंत्रणा राबवली, राजा असूनही लोकसंपर्क ठेवला, कायम समंजस्यपणा व समन्वयाची भूमिका घेतली, त्याचा परिपाक म्हणून जनतेने शिवेंद्रराजेंना स्वीकारले. नम्रता, विनयशिलता या गुणांमुळे शिवेंद्रराजे विजयी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article