मंडणगड : संसद आदर्श ग्राम योजनेसंदर्भात आंबडवे येथे आयोजित बैठकीत पद्मश्री दादा इदाते, माजी खासदार अमर साबळे व अन्य मान्यवर.pudhari photo
Published on
:
22 Jan 2025, 12:20 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:20 am
मंंडणगड : घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाव आंबडवे येथील मागील काही वर्षे प्रलंबित असलेली केंद्र सरकारची संसद आदर्श ग्राम योजना नव्याने कार्यान्वित होण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. या संदर्भात दि. 22 जानेवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, माजी खासदार अमर साबळे यांची वरिष्ठ अधिकार्यांसमवेत बैठक आयोजित केली आहे. बैठकीत आंबडवे गावाचा या योजनेच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून सर्वांगीण विकास करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
या योजनेसंदर्भात राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी दि. 20 जानेवारी 2025 रोजी आंबडवे येथे तहसीलदार व सबंधित विभागाच्या अधिकार्यांसह दौरा केला. यानतर आंबडवेतील स्मारक येथे योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात तयार करण्यात आलेला प्रारूप आराखडा व ग्रामस्थांच्या सूचना यावर आढावा बैठक पार पडली. बैठकीत पद्मश्री दादा इदाते, माजी खासदार अमर साबळे, तहसीलदार अक्षय ढाकणे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता माधव कोंडविलकर, अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडणगड तालुक्यातील मुळगाव आंबडवेचा सन 2014 - 15 साली विशेष बाब म्हणून समावेश करण्यात आला. तत्कालीन राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी विकासाच्या दृष्ठीने आंबडवे गाव दत्तक घेतले. या योजनेच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधून आंबडवे गावाची ओळख जगाच्या नकाशावर आणण्यासाठी शासनाच्या विविध विभागांच्या सहभागाने कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. त्यातील आंबडवे - राजेवाडी या राष्ट्रीय महामार्गाचे काम सद्या सुरु आहे. मात्र, महामार्गाचे काम व अन्य एखादे दुसरे विकासकामे वगळता इतर कोणतेही काम पूर्णत्वास गेलेले नाही व ही योजनाच प्रलंबित राहिली.
मध्यंतरीच्या काळात संसद आदर्श योजनेच्या अनुषंगाने तहसील, समाजकल्याण विभाग, सिडको, सार्वजनीक बांधकाम विभाग यांच्या बैठका, आराखडे या संदर्भात हालचाली सुरु होत्या. मात्र, त्यास विशेष गती येत न्हवती. माजी खासदार अमर साबळे यांनी सोमवारी तालुक्यास भेट दिल्यानंतर योजनेसंदर्भात संबंधित विभागांचा आढावा घेतला. व त्यानंतर हालचालीं वेगाने सुरु झाल्या आहेत.