आता अवघ्या तीन दिवसांत मिळणार नवीन नळजोड; पाणीपुरवठा विभागाने दिले आदेश pudhari
Published on
:
04 Feb 2025, 6:03 am
Updated on
:
04 Feb 2025, 6:03 am
पुणे: महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर आता अवघ्या तीन दिवसांत नवीन नळजोड दिला जाणार आहे. नवीन बांधकामे तसेच मिळकतींना हे नळजोड देण्यासंबंधीचे आदेश पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे. केवळ मालकी हक्क आणि मिळकतकराची नोंदणी असली, तरी आता नवीन नळजोड मिळणार आहे.
नवीन नळजोड देताना अर्जी कागदपत्रे, बांधकामाचा मान्य नकाशा, कॉलनी वॉटरलाइन, डेव्हलपमेंट प्रमाणपत्र, भोगवटापत्र, पूर्वीचा नळजोड असल्यास बिल, मालकाचे नाव-पत्ता कागदपत्रे, परवानाधारक प्लंबरचा वैध दाखला, नळजोड घेणार त्याचा नकाशा, हमीपत्र अशा डझनभर कागदपत्रांची मागणी केली जात होती.
या सगळ्या किचकट प्रक्रियेमुळे नागरिक अनधिकृत नळजोड घेण्यास प्राधान्य देत होते. त्यामुळे शहरात अनधिकृत नळजोडांची संख्या काही लाखांवर गेली आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने आता नवीन नळजोडांसाठी कागदपत्रांची संख्या कमी करून केवळ मालकी हक्क आणि मिळकतकराची नोंदणी असली, तरी नळजोड देण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता तीन दिवसांतच नवीन नळजोडाला मान्यता दिली जाणार आहे.
...तरच नळजोडांना मिळणार मान्यता
ज्या अर्जासोबतची कागदपत्रे पूर्ण असतील तसेच अर्ज पूर्ण भरलेला असेल, त्यांनाच या कालावधीत मान्यता दिली जाईल. अपूर्ण कागदपत्रे अथवा अर्ज असल्यास तसेच कागदपत्रांबाबत काही शंका असल्यास या मुदतीत मान्यता दिली जाणार नाही. तसेच, ही प्रशासकीय मान्यता असून, प्रत्यक्ष नळजोड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तसेच, या नव्याने दिलेल्या नळजोडांची स्वतंत्र नोंदही ठेवली जाणार आहे.