Published on
:
28 Nov 2024, 11:49 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:49 pm
लंडन : ब्रिटनमधील रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीने मायक्रोसॉफ्ट एआयच्या मदतीने स्मार्ट बगीचा साकारला आहे. यामध्ये एआय मॉडेल पूर्ण बगीच्याची देखभाल करते आणि बागेतील कोणत्या रोपांना पाण्याची किती आवश्यकता आहे हे सांगते, हे या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य आहे.
एरवी, बाल्कनीतून डोकावत बागेकडे एक नजर टाकली तर रोपांकडे पाहून त्यांना पाण्याची किती गरज आहे, हे ठरवावे लागते. रोपे सुकू नयेत, यासाठी त्यांना रोज ठरावीक वेळी पाणी दिले जाते. मात्र, हवामानानुसार आणि वेळेनुसार, कोणत्या रोपट्याला किती पाणी हवे आहे, हे सांगणारे तंत्रज्ञान या हॉर्टिकल्चर सोसायटीने साकारले आहे. एआय संचलित या उद्यानात रोपट्यांना पाण्याच्या आवश्यकतेसह त्यांना द्यायची खते, त्यांना आकार देण्याची आवश्यकता, यासाठीही एआय काही सूचना देते. अगदी रोपट्यांना किडे लागले तर त्याचेही निर्देश सदर एआय मॉडेल देणार आहे. हा स्मार्ट बगीचा सर्वसामान्यांसाठी पुढील वर्षी खुला केला जाईल, असे तूर्तास जाहीर केले गेले आहे.
रोपट्यांच्या आवश्यकतेचे संकेत योग्य रितीने वाचता यावेत, यासाठी या बागेत वेगवेगळ्या सेंसरचे नेटवर्क तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून मातीची आर्द्रता, त्यातील क्षारांचे प्रमाण व पोषकतत्त्वांचा स्तर, तसेच हवा आणि पावसाचे मोजमाप यात ठेवले जाते. हा सर्व डाटा बागेत ठेवण्यात आलेल्या एआय मॉडेलकडे जातो आणि हे मॉडेल त्याचे विश्लेषण करून रोपांबाबत सर्व माहिती पुढे पाठवतो, अशी याची रचना आहे. विशेषत: मोठ्या बागांमध्ये हे तंत्र विशेष उपयुक्त ठरते, असा होरा आहे. रॉयल हॉर्टिकल्चर सोसायटीशी संलग्न असणारे संशोधक मैसी व जे. आहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, एआयने बागेची कोणतीही रचना केलेली नाही. फक्त रोपांबाबत माहिती पुरवण्याची जबाबदारी एआयकडे आहे आणि एआयच्या निर्देशानुसारच त्याची देखभाल केली जाते.