आपल्याकडे सध्याच्या घडीला लग्नाचा सीझन सुरु झालेला आहे. लग्न हे प्रत्येक कपल्सच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन घरामधील ऋणानुबंधाच्या गाठी लग्नामुळे जुळल्या जातात. लग्नामुळे केवळ दोन व्यक्ती नाही तर दोन कुटूंब एकत्र येत असतात. लग्नसोहळा हा म्हणूनच दोन्ही घरांसाठी चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा विषय बनलेला असतो. या लग्नसोहळ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नासाठी करण्याचे शाॅपिंग. लग्नासाठी शाॅपिंग करताना आपण काही गोष्टी या आवर्जून पाळायलाच हव्यात. म्हणजे लग्नसोहळ्याचा आनंद अधिक द्विगुणित होईल.
लग्नासाठी शाॅपिंग करताना चुकूनही शनिवार रविवार शाॅपिंगसाठी बाहेर पडू नका. वीकेंडला मार्केट ही अतिशय गजबजलेली असतात. त्यामुळेच या दिवशी तुम्हाला घाईघाईत शाॅपिंग उरकावे लागेल. त्यापेक्षा तुम्ही शाॅपिंग करण्यासाठी सोमवार ते शुक्रवार यापैकी एखादा दिवस निवडावा.
तुमचा पेहराव निवडताना तुम्ही आधीपासून काही गोष्टी ठरवून ठेवा. एखाद्या सेलिब्रिटी किंवा ओळखीच्या व्यक्तीने घातलेला पेहराव हा तुम्हाला सूट होईल असे नाही. त्यामुळे तुम्ही पेहराव निवडताना तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे हे लक्षात घ्या. समोरच्याला एखादी गोष्ट सूट होतेय म्हणून ती तुम्हाला पण होईल असे नाही. प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, त्यामुळे त्याला कुठली गोष्ट खुलून दिसेल हे ज्याचे त्याने ओळखायचे.
लग्नाच्या शाॅपिंगला जाताना तुमच्या सोबत मित्र मैत्रिणीला अजिबात नेऊ नका. त्यापेक्षा तुमच्या सोबत जाणकार व्यक्तीला न्या. अशा जाणकार व्यक्तीला न्या, ज्याला कपड्यासंबंधी उत्तम माहिती असेल. तसेच इतर शाॅपिंगसंदर्भातही ती व्यक्ती तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करेल.
आयत्या वेळी बजेट ठरवू नका. त्यामुळे तुमचे बजेट काय आहे ते आधीच ठरवून जा. म्हणजे तुम्हाला शाॅपिंग करणे हे अधिक सोयीस्कर होईल. आयत्या वेळी बजेट वाढल्यास, तुम्हालाच त्याचा भुर्दंड सहन करावा लागेल.