जिल्ह्याच्या निकालात सातारच्या राजघराण्याचाही करिष्मा दिसून आला. Pudhari File Photo
Published on
:
24 Nov 2024, 1:46 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:46 am
सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी अवघ्या महाराष्ट्रात मिळवलेल्या 1 लाख 42 हजार 124 एवढ्या विक्रमी मताधिक्यामुळे त्यांचा राजकीय दबदबा आणखी वाढला असून राज्याच्या राजकारणातही बाबाराजेंचा प्रभाव वाढला आहे. शिवेंद्रराजेंच्या या यशामुळे सातारा जिल्ह्यातही भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या साथीने आ. शिवेंद्रराजेंची कॉलर आणखी टाईट झाली असून जिल्ह्याच्या राजकारणाची सुत्रे राजेबंधूंच्या हाती राहणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या निकालात सातारच्या राजघराण्याचाही करिष्मा दिसून आला.
सातारा-जावली विधानसभा मतदार संघातील आ. शिवेंद्रराजे भोसले व महाविकास आघाडीचे अमित कदम यांच्यातील लढतीबाबत जिल्ह्यात फारसे औत्सुक्य दिसत नव्हते. आ. शिवेंद्रराजे भोसले यांची या मतदार संघावरील मजबूत पकड पाहता नवख्या अमित कदम यांचा विरोध तेवढा ताकदवर समजला जात नव्हता. अमित कदम यांनी एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही लढत औपचारिकच ठरली. आ. शिवेंद्रराजे यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत आपल्या ऐतिहासिक विजयाची मुहूर्तमेढ रोवली. शिवेंद्रराजेंचे महाराष्ट्रातील नंबर 1 चे मताधिक्य सातार्यातच नव्हे तर राज्यात चर्चेचे ठरले.
आ. शिवेंद्रराजे भोसले विक्रमी मताधिक्य मिळवणार याची खूणगाठ अगोदरपासूनच बांधली जात होती. प्रचाराच्या सुरूवातीपासून तशा वातावरणाची निर्मिती झाली होती. प्रचारातही प्रत्येक ठिकाणी राजेंच्या विक्रमी मताधिक्याचे आवाहन केले जात होते. खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी आ. शिवेंद्रराजेंच्या गांधी मैदानावरील प्रचार सांगता सभेतही विक्रमी मताधिक्य देण्याचे आवाहन केले होते. ‘सातारा व जावली तालुक्यातील जनतेने राजघराण्यावर निस्सीम प्रेम केले. जनतेची सेवा करावी, याच उदात्त हेतूने आम्ही दोघेही काम करत आहोत. मागील निवडणुकीत आ. शिवेंद्रराजेंना राज्यात दुसर्या क्रमांकाची मते मिळाली होती.
आता मात्र राज्यात प्रथम क्रमांकाचे मताधिक्य मिळायला हवे. आता एकच फतवा, शिवेंद्रराजेंना विक्रमी मताधिक्याने विधानसभेत पाठवा’, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले होते. प्रत्यक्षात घडलेही तसेच. त्यामुळे आ. शिवेंद्रराजे यांनी मिळवलेल्या या विक्रमी मताधिक्यामध्ये खा. उदयनराजेंचे योगदानही तेवढेच निर्णायक समजले जाते. गांधी मैदानावरील याच सभेवेळी उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना आपल्या स्टाईलने कॉलर उडवण्यास सांगितले होते. त्यानंतर शिवेंद्रराजेंची कॉलर टाईट ठेवा, असेही उदयनराजे म्हणाले होते. मतदारांनी त्याला चांगला प्रतिसाद दिल्याचे विक्रमी मताधिक्यावरून दिसून आले. खा. उदयनराजे यांचा जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा जिल्ह्यात भाजपला झाल्याचे चित्र आहे. आगामी काळात दोन्ही राजेंची ताकद भाजपला आणखी बळ देणार असून जिल्ह्याच्या राजकारणाच्या चाव्या या राजे बंधूंच्याच हाती राहणार आहेत.
भाऊसाहेब महाराजांनंतर बाबाराजेही हेविवेट नेते
सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांचा वरचष्मा राहिला होता. भाऊसाहेब महाराजांनी जिल्ह्यावर आपल्या नेतृत्वाची कमांड ठेवली होती. आता त्याच मार्गावरून आ. शिवेंद्रराजे यांची वाटचाल सुरू आहे. जिल्ह्याचे हेवीवेट नेते म्हणून भाऊसाहेब महाराजांच्यानंतर बाबाराजेंचा करिष्मा दिसू लागला आहे. उदयनराजे भोसले यांच्या साथीने शिवेंद्रराजे जिल्ह्याचे नेते म्हणून उदयाला आले आहेत.