Published on
:
18 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:30 am
ज्या लोकांमध्ये ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांची हाडे ठिसूळ होतात व कातडीही सैल होते. शिवाय क जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दाढ हलणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करावा. फळे, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, भोंगी मिरची, रसाळ व कडवट फळे इत्यादींमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.
क जीवनसत्त्व हे शरीरातील मूलभूत रासायनिक क्रियांमध्ये समतोल निर्माण करून शरीरातील क्रिया प्रमाणित करण्यास मदत करते. संवाहकांकरवी संदेश पाठवणे, पेशींपर्यंत ऊर्जा पोहोचविणे इत्यादी शरीरातील अनेक महत्त्वाच्या रासायनिक क्रियांचे नियंत्रण क जीवनसत्त्व करते. व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबत शारीरिक जखमादेखील जलद गतीने ठीक होतात. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. क जीवनसत्त्वामधील अँटिऑक्सिडंट शरीरातील फ्री रॅडिक्ल्सशी लढते. फ्री रॅडिकल्समुळे त्वचेवर लवकर सुरकुत्या पडतात आणि शरीराचे अवयव लवकर बाधित होऊ लागतात. त्यामुळे आपल्या आहारात क जीवनसत्त्व असलेल्या फळांचा समावेश जरूर करावा.
काही लोकांच्या मते, क जीवनसत्त्वामुळे सर्दी पडसे कमी न होता वाढते; पण संशोधनाअंती हे सिद्ध झाले आहे की, क जीवनसत्त्व सर्दीवरही गुणकारी आहे. आपल्याला आठवत असेल, तर कोरोना काळात दिल्या जाणार्या औषधांमध्ये सी व्हिटॅमिनच्या गोळीचा समावेश होता. प्रत्येक पेशीचा व्यवस्थित विकास होण्यासाठी क जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक घटक आहे. ज्या लोकांमध्ये क जीवनसत्त्वाची कमतरता असते, त्यांची हाडे ठिसूळ होतात व कातडीही सैल होते. शिवाय क जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिरड्यांमधून रक्त येणे, दात दुखणे, दाढ हलणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे आपल्या आहारात क जीवनसत्त्वाचा समावेश करावा. फळे, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, भोंगी मिरची, रसाळ व कडवट फळे इत्यादींमध्ये क जीवनसत्त्व असते. तज्ज्ञांच्या मते, दररोज 60 मिलिग्रॅम क जीवनसत्त्व शरीरात जायलाच हवे.
क जीवनसत्त्वामुळे आपल्या मेंदूच्या कार्यक्षमतेत सुधारणा होते व आपला मूड चांगला बनण्यास मदत होते. सेरोटोनीन या मेंदूत स्रवणार्या द्रव्याच्या उत्पत्तीसाठी क जीवनसत्त्वाची खूप मदत होते. हे द्रव्य झोप येणे व सकारात्मक विचार उत्पन्न करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. क जीवनसत्त्वाला ‘स्ट्रेस व्हिटॅमिन’ असेही म्हणतात; कारण तणावाच्या अवस्थेत क जीवनसत्त्वाचे सेवन केल्यास मनःस्थिती स्थिर राहण्यास मदत होते.