‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुखची भूमिका साकारलेले अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर मोकळेपणे व्यक्त होतात. इन्स्टाग्रामवर ते विविध पोस्टद्वारे आपली मतं मांडताना, विविध अनुभव सांगताना दिसतात. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या मुलाखतीत ते कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल व्यक्त झाले. पडद्यावर विविध भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने एकतर लग्नच करू नये, असं रोखठोक मत त्यांनी मांडलंय. त्यामागचं कारणसुद्धा त्यांनी समजावून सांगितलं आहे.
काय म्हणाले मिलिंद गवळी?
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये. हे प्रोफेशन असं आहे की त्या प्रोफेशनमध्ये तुम्ही तुमचा बॅलेन्स, मानसिक स्वास्थ्य गमावून बसता. कारण तुम्ही तुमच्या भावना विकत असता. चित्रपटात काम करताना 30 दिवसांनंतर घरी आल्यावर आठ दिवसांचा वेळ मिळायचा. त्या आठ-दहा दिवसांत तुम्ही डिटॉक्स होता. पण मालिकेत काम करताना तुम्हाला डिटॉक्स करायला वेळच मिळत नाही. त्यामुळे मी अनिरुद्धची किंवा रवी भंडाकरची भूमिका साकारत असेन तर घरी अनिरुद्ध देशमुखसुद्धा येऊ शकतो. तो तिथे टाकून किंवा सोडून येता येत नाही. कारण लगेच दुसऱ्या दिवशी परत तोच अनिरुद्ध सेटवर असतो. त्यामुळे कुठेतरी मेडिटेशन (ध्यानसाधना), अध्यात्म यांची गरज असते. माझ्या पत्नीच्या अध्यात्मामुळे आमचं वैवाहिक आयुष्य अजूनही सुरळीत चालू आहे असं मला वाटतं,” असं ते या मुलाखतीत म्हणाले.
हे सुद्धा वाचा
मुलाखतीचा हा व्हिडीओ पोस्ट करत मिलिंद यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘सुलेखा तळवळकर आणि मी अनेक वर्षे या कलाक्षेत्रात असल्यामुळे या क्षेत्रातल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाजूंवर चर्चा केली. प्रोफेशनल हझार्ड (व्यावसायिक धोका), प्रत्येक क्षेत्राची एक काळी बाजू असते आणि आपण त्याच्या आत असल्यामुळे ती बाजू आपल्याला दिसत नाही. जोपर्यंत वेगळ्या दृष्टीकोनातून त्याच्याकडे आपण बघत नाही, तोपर्यंत ती आपल्याला जाणवतसुद्धा नाही आणि हे प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. या कलाक्षेत्रामध्ये ते प्रकर्षाने जाणवतं किंवा दिसतं. मानसिक स्वास्थ्य, मनाचा समतोल, भावना.. एका कलाकाराच्या जीवनामध्ये याच्या अनेक गोष्टी असतात, ज्या अजिबात दिसत नाहीत. कालांतराने त्या जाणवायला लागतात, बऱ्याच वेळेला त्या कलाकाराला नाही पण त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्या प्रकर्षाने जाणवतात. बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतं की तू खूपच बदलला, तू असा नव्हता, तो असा वागेल असं वाटलंच नाही.’
‘आपण म्हणतो ना भावनांशी खेळू नका, ते मानसिक संतुलनासाठी बरोबर नाही. पण एक कलाकार रोज त्याच्या भावनांशीच खेळत असतो आणि कालांतराने त्याचे परिणाम त्याला जाणवायला लागतात. खरं तर हा विषय खूप गहन आहे आणि मी काही त्यातला एक्स्पर्ट नाही. पण खरंच विचार करणारा हा विषय आहे,’ असं मत त्यांनी मांडलंय.