Published on
:
28 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:38 pm
पॅरिस : सिनेमात आपण नेहमी पाहतो की, अभिनेत्याकडे किंवा अभिनेत्रीकडे स्वत:चे प्रायवेट जेट असते, ज्याने ते कुठेही फिरायला जातात. हे प्रायवेट जेट खूपच लक्जरी असतात. ज्यामधून फक्त ते किंवा त्यांचा जोडीदारच प्रवास करतो. अगदी प्रत्यक्षात देखील अशा कलाकारांकडे, तसेच बड्या उद्योजकांकडे स्वत:च्या मालकीचे प्रायव्हेट जेट असतात. या खासगी जेटचा रुबाब वेगळाच, याबद्दल दुमत नाहीच. मात्र, प्रायव्हेट जेट खरेदी करायचे ठरवले तर आपल्या खिशात किती पैसे असावे लागतील आणि हे असे जेट मिळतात तरी कुठे, हा प्रश्न मनाला शिवल्याशिवाय राहणार नाही!
व्यक्तीला खूप जास्त श्रीमंत किंवा बिझनेसमॅन दाखवण्यासाठी प्रायवेट जेट दाखवला जातो. हे पाहून अनेकदा लोकांना वाटते की आपलेही जेट असते तर किती भन्नाट झाले असते. या पार्श्वभूमीवर प्रायवेट जेट आणि त्याच्या किमतीबद्दल उत्सुकता असणे साहजिक आहे. आकार, रेंज आणि सुविधांचा विचार करता जेटची याची किंमत वेगवेगळी असते; पण हे प्रायवेट जेट 2 मिलियन ते 100 मिलियनपर्यंत म्हणजे भारतीय किमतीत 16 ते 800 कोटींच्या दरम्यान मिळते. आता प्रश्न असा उपस्थित राहतो की, याची खरेदी कशी केली जाते? तसे पाहता विमान विकत घेण्याचे अनेक मार्ग आहेत. पूर्णपणे नवीन किंवा सेकंड हँड विमानही मिळू शकते. हे त्याचप्रकारे असते, जसे आपण नवीन किंवा जुनी कार विकत घेता. तसे पाहता प्रायवेट जेट असणे हे खूपच खर्चीक गोष्ट आहे. रोजच्या मेटेंनन्स खर्चापासून ते त्याच्या साफसफाई आणि पायलटपर्यंतचा खर्च मोठा असतो. प्रायवेट जेट विकत घेण्याचा विचार असेल तर यासाठी काही एअरक्राफ्ट मॅनेजमेंट कंपनी तसेच काही एजंटची मदत घेता येऊ शकते. तसे पाहता तासाच्या हिशोबाने देखील काही कंपन्या प्रायवेट जेट भाड्याने देतात. अशावेळी एक जेट भाड्याने घेण्यासाठी 1 लाखापासून ते 9 लाखांपर्यंतची रक्कम मोजावी लागू शकते.