कुडाळ : नीलेश राणे यांच्या विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीमध्ये नीलेश राणे आणि नितेश राणे यांनी असा जल्लोष केला.pudhari photo
Published on
:
24 Nov 2024, 1:30 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:30 am
कुडाळ : कुडाळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नीलेश नारायण राणे यांनी 8 हजार 176 मताधिक्य घेत विजय मिळवत कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना मविआ तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांचा पराभव केला. विजयानंतर महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, ढोल-ताशासह फटाके व रंगांची उधळण करत, भगवे झेंडे फडकावत विजयाचा मोठा जल्लोष केला. जल्लोषामुळे कुडाळ शहरातील परिसर भगवामय झाला. या विजयामुळे कुडाळ विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांपूर्वीच्या विजयाचा जल्लोष दिसून आला.
कुडाळ विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवारी झाली. मतमोजणीदरम्यान महायुतीच्या कार्यकर्त्यांना एस. एन. देसाई चौकात, तर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कुडाळ येथील गार्डनसमोरील जागा थांबण्यासाठी दिली होती. यावेळी पोलिसांचा फाटा सज्ज ठेवण्यात आला होता. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुडाळ-मालवण मतदारसंघाचा निकाल शेवटपर्यंत चुरशीचा ठरला. पहिल्या फेरीत नीलेश राणे यांनी मताधिक्य मिळवल्याने महायुतीच्या गटात उत्साह निर्माण झाला होता; मात्र लगेच दुसर्या व तिसर्या फेरीत वैभव नाईक यांना मताधिक्य मिळाल्याने राणे समर्थक व शिंदे शिवसेना महायुती गटात शांतता पसरली होती. पहिल्या तीन फेर्यांपर्यंत एस. एन. देसाई चौक परिसरात शांतता होती; मात्र चौथ्या फेरीत नीलेश राणे यांना मताधिक्य मिळाल्यानंतर राणे समर्थक व महायुतीच्या कार्यकत्यांत उत्साह संचारला. सुरुवातीला मोजके कार्यकर्ते व काहीसा सुना सुना असलेला हा परिसर चौथ्या फेरीनंतर गर्दीने हळूहळू फुलत गेला. सुरुवातीला एकही झेंडा नसलेला हा परिसर अवघ्या अर्ध्या तासात भगवामय झाला. विजय जवळ येताच नीलेश राणे कार्यकर्त्यांत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी नीलेश राणेंभोवती गराडा घातला. त्यांना हजारो हातांनी शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांच्या पत्नी सौ. नीलम राणे कुडाळमध्ये दाखल होताच कार्यकर्त्यांचा जोश अधिकच बहरला.
मतमोजणीच्या पंधराव्या फेरीनंतर नीलेश राणे यांच्या विजयाचा कल लक्षात येताच महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एस. एन. देसाई चौकात घोषणाबाजी देत, भगवे झेंडे फडकावत, फटाके फोडत जोरदार जल्लोष सुरू केला. डीजेच्या तालावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ताल धरला. देसाई चौकापासून महायुतीच्या कार्यालयापर्यंत गुलाल उधळत जल्लोषात लक्षवेधी रॅली काढण्यात आली. या रॅलीत उमेदवार नीलेश राणे सहभागी झाले. रॅलीतून हात उंचावून अभिवादन करत होते. काही कार्यकर्त्यांनी जेसीबीतून पुष्पहार घालत नीलेश राणे यांचे अभिनंदन केले. शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांनी उचलून घेतले. यावेळी ‘दत्ता तिथे सत्ता’ अशा घोषणाही देण्यात आला. दत्ता सामंत व नीलेश राणे यांचे फोटोंचे फलकही या गर्दीत झळकले. शिंदे गट शिवसेनेचे उपनेते संजय आग़्रेही उपस्थित होते. शिवाजी महाराज की जय.... जय श्रीराम... अब एकही नारा.... जय श्रीराम जय श्रीराम, नीलेश राणे आमदार है बाकी सब भंगार है... अशा घोषणाही देण्यात आल्या.
अन् तो बॅनर पुन्हा एकदा झळकला कुडाळ तालुक्यात मतमोजणीच्या आदल्या दिवशी नाद करा, पण आमचा कुठं... आमदार नीलेश राणे शुभेच्छा... अशा आशयाचा बॅनर झळकला होता. या बॅनरमधून राणे समर्थकांचा विजयाचा आत्मविश्वास ओसंडून वाहताना दिसत होता. ज्यावेळी नीलेश राणे यांचे मताधिक्य वाढत गेले, त्यावेळी तो बॅनर पुन्हा एकदा या कार्यकर्त्यांमध्ये झळकला. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नीलेश राणे यांना मतदारसंघातील 276 बुथवर मताधिक्क्य मिळाले, तर विद्यमान आमदार वैभव नाईक यांना केवळ 3 बुथवर मताधिक्य मिळाले आहे.
राणेंबंधुची गळाभेट! कणकवली मतदार संघाचे आ. नीतेश राणे यांनी कुडाळ येथे उपस्थित राहत आपला भाऊ व नवनिर्वाचित आ. नीलेश राणे यांची भेट घेत नीलेश राणे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही भावांनी गळाभेट घेऊन या विजयाचा आनंद द्विगुणित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठकीसाठी मुंबईला बोलावून केल्या असल्यामुळे आपण जात असल्याचे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगत ते मुंबईला मार्गस्थ झाले.