Chief Minister Dr. Pramod SawantPudhari Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:31 pm
पणजी : राज्यात गाजणार्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण, आर्थिक फसवणूक प्रकरणात संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोक तक्रारी द्यायला पुढे येत नाहीत, त्यांना तक्रार देण्यास प्रोत्साहन देण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे. सर्व संशयितांना अटक झालीच पाहिजे, अशीही सूचना देण्यात आली आहे. फसवणूकप्रकरणी अद्याप राजकीय लोकांचा समावेश असल्याचे निष्पन्न झालेले नाही. या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.
मुख्यमंत्री म्हणाले, कॅश फॉर जॉब प्रकरण आपणच उघड केले होते. तपास कामात कुठेही हस्तक्षेप केलेला नाही. पोलिस कारवाई करीत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. यातून अनेक प्रकरणे समोर आली असल्याचे ते म्हणाले. कुडचडे येथे एका महिलेने बँकेतील पैसे हडप केल्याप्रकरणी संशयित गजाआड झाल्यानंतर आता अनेक तक्रारदार पुढे येत आहेत. दाखल तक्रारीनुसार कारवाई केली जाईल. कारवाईसाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक दिलेली आहे. पोलिस संशयितांविरोधात पुरावे गोळा करत आहेत. बहुतेक व्यवहार हे रोखीने झाले असले तरी त्यासंदर्भातील पुरावे कसे गोळा करावेत, हे पोलिसांना माहीत आहे. ते योग्य कारवाई करतील. शेवटच्या संशयिताला अटक होईपर्यंत तपास सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.