Published on
:
05 Feb 2025, 1:12 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:12 am
पणजी : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकार्यासह (जेलर) चार जणांना अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. यात जेलर कृष्णा उसगावकर, आयआरबी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सूरज तोरसकर यांच्यासह एक हवालदार व कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे.
आयआरबी पोलिसांच्या अहवालाच्या आधारे तुरुंग प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कोलवाळ येथील हे मध्यवर्ती कारागृह वादग्रस्त कारवायांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. सराईत गुन्हेगाराकडून जेवणाचे निमित्त करून हल्ल्याची घटना असो किंवा खुद्द कर्तव्यावरील पोलिसांकडून अमली पदार्थ लपवून तुरुंगात नेण्याचा प्रकार असो, या घटनांमुळे कारागृह चर्चेत आले होते. शिवाय कैद्याने तुरुंगात पेटवून घेण्याचा प्रकार असो किंवा पोलिसाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने निलंबित झाल्यावर कारागृहात असताना दोन महिला पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार असो, हे कारागृह या ना त्या कारणाने चर्चेत राहिले आहे. आता पुन्हा एकदा लाखो रुपये किमतीच्या अमली पदार्थाचे तस्करी प्रकरण पुढे आले आहे. यात चौघेजण निलंबित झाले आहेत, ज्यात खुद्द जेलरही आहेत.