कोल्हापूर ः चार दशकाहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठ स्थापनेसाठी शासन आणि न्यायव्यवस्थेचे लक्ष वेधण्यासाठी 18 फेब्रुवारीला कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य लक्षवेधी महारॅली काढण्याचा एकमुखी निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी घेण्यात आला. बैठकीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे बार असोसिएशन अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडपीठाच्या मागणीसाठी भविष्यात आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली कसबा बावडा येथील न्याय संकुलात शाहू सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ, खंडपीठ कृती समिती यांच्यासह पक्षकारही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. सर्जेराव खोत म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूरला खंडपीठ स्थापन व्हावे या मागणीसाठी 40 वर्षांपासून प्रदीर्घ लढा सुरू आहे. अनेक आंदोलने झाली, चळवळी झाल्या. पण कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार घडला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी भेटीगाठी होऊनदेखील या प्रश्नाकडे डोळेझाक करण्यात आली आहे.
अॅड. खोत पुढे म्हणाले की, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गेल्या 40 वर्षांत कोल्हापूर खंडपीठासाठी कोल्हापूरसह जिल्ह्याला पाठबळ दिले आहे. वेळोवेळी मुख्यमंत्र्यांशीही त्यांची बोलणी झाली आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा झाली आहे. खंडपीठासाठी सरकार सकारात्मक असले तरी याबाबतचा अधिकृत निर्णय होण्याची गरज आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात शासनस्तरावर पाठपुरावा करावा लागणार आहे.
कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी भविष्यात आणखी तीव— लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 18 फेब—ुवारी रोजी कोल्हापुरात वकील, पक्षकार आणि सेवाभावी नागरिकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेध महारॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही अॅड. खोत यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील 3500 वकील, खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी असे एकूण 5500 जण महारॅलीत सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कसबा बावडा येथील न्याय संकुल येथून या दिवशी सकाळी दहा वाजता महारॅलीचा प्रारंभ होईल. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल. जिल्हाधिकार्यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले कोल्हापूर खंडपीठासाठी कोल्हापूरसह जिल्ह्यातील वकील आणि पक्षकार यांच्या भावना तीव— आहेत. या भावना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्यापर्यंत पोहोचतील आणि या प्रश्नाला गती लागेल, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला. शासन आणि न्यायव्यवस्थेने या प्रश्नाची वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात पुन्हा लोकलढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. शिवाजीराव राणे म्हणाले की, कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंचच्या मागणीसाठी आजवर अनेक लढे झाले, आंदोलने झाली. सहा जिल्ह्यांतील वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले. खंडपीठासाठी धगधगता संघर्ष सुरू असतानाही शासन आणि न्यायव्यवस्थेला त्याची फिकीर वाटत नाही. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखालीच खंडपीठाच्या लढ्यासाठी आपणाला एकत्रित येऊन लढावे लागणार आहे. तत्पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यासह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार आणि सेवाभावी संस्थांची वज्रमूठ बांधण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले
महाराष्ट्र, गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठासह वकिलांचे अन्य प्रलंबित प्रश्न गंभीर आहेत. ज्युनिअर वकिलांना दरमहा पाच हजार रुपयाचे स्टायपेंड मिळावे, अशी मागणी आहे. याबाबतही शासन यंत्रणा उदासीन आहे. या दोन्हीही प्रश्नांसाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आपणाला नियोजन करावे लागेल. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. गिरीश खडके म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंच स्थापनेच्या लढ्याला अलीकडच्या काळात मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून आणि आपापसात असणारे सर्व मतभेद बाजूला ठेवून भविष्यात आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागणार आहे. महामोर्चा, मोटारसायकल रॅली, साखळी उपोषण याशिवाय आता पर्याय राहिला नाही.
बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजितराव मोहिते म्हणाले, कोल्हापूर खंडपीठ, सर्किट बेंचसाठी आता आपणाला आर या पारची लढाई करावी लागेल. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने भविष्यात कोल्हापूरसह जिल्ह्याला निश्चित न्याय मिळेल, अशी मला अपेक्षा आहे. यावेळी झालेल्या चर्चेत अॅड. विजय महाजन, अॅड. राजेंद्र मंडलिक, अॅड. प्रकाश मोरे, चेतन शिंदे, अॅड. प्रताप सासणे, अॅड. पिराजी भावके, अॅड. धनंजय पाटील, अॅड. सतीश कुणकेकर, अॅड. राजेंद्र केळकर, अॅड. सचिन आवळे, अॅड. अजित सावंत यांनी भाग घेतला.