Published on
:
05 Feb 2025, 1:24 pm
Updated on
:
05 Feb 2025, 1:24 pm
अर्जुनवाडा: तिटवे (ता.राधानगरी) येथील सुमारे ३५ एकरातील ऊस जळून खाक झाला.आग नेमकी कशाने लागली हे जरी स्पष्ट झाले नसले तरी वीसहुन अधिक शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी आणि जळीत ऊसाला साखर कारखान्याने नुकसान भरपाई धरू नये नियमित दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तिटवे येथील गोगांना नावाच्या शेतातील ऊसाला आज सकाळी अकरा वाजता आग लागली. उन्हाची तीव्रता असल्याने बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावाशेजारीच उसाला आग लागल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र जिकडे बघावे तिकडे आगीचा लोंडा आणि धूर दिसत होता. त्यामुळे आग विझवण्यात अडथळा येत होता. या आगीत 20 शेतकऱ्यांचे सुमारे 35 एकरातील ऊस जळून खाक झाला. शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली होती.
एका गरीब ऊस उत्पादक महिला शेतकऱ्याने तर हंबरडाच फोडला होता. साहेब मी १४ महिने या शेतात राबराब राबली आहे. वय झाल्याने कामाचा त्रास होत होता,अशातच कर्ज काढून खतपाणी घातले होते. यातून मिळणाऱ्या पैशातून वर्षभर आमचा घर खर्च चालायचा आता आम्ही खायचं काय आणि मुला बाळांचे शिक्षण कसं व्हायचं असा सवाल केला. धापा टाकतच ही वृद्धा जळालेल्या उसाकडे गेली. आणि ओक्साबोक्सी रडू लागली.
हंगाम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनाच ऊस तोडून आणि भरून द्यावा लागतो.वरती पाव्हनेर आणि रंगीत पार्टी वेगळीच.कारखानदारांचे ऊस तोडणीवर नियंत्रण नाही. शेतकऱ्यांच्या उसातून तोडणी ओढणीची रक्कम घेतली जात असताना वरून आणखी पैसे मागितले जातात.मग कारखाना अशा लोकांच्यावर का कारवाई करत नाही?
अजित पोवार , स्वाभिमानी जिल्हाध्यक्ष