उत्तूर : मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलावर संदेश कोपटकर, अमन मुल्ला व सूरज चौगुले (सर्व रा. बहिरेवाडी) या तिघांनी हल्ला केला. बहिरेवाडी येथील युवराज रावळ (वय 17) असे या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. त्याच्या पाठीवर व पोटावर चाकूने वार करून जखमी केले. याबाबतची फिर्याद युवराज रावळ याने आजरा पोलिसात दिली आहे.
युवराज, संदेश, अमन, सूरज हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या वर्षी गणेशोत्सवात मोबाईलवर स्टेटस ठेवण्यावरून युवराज याच्याबरोबर इतर तिघांचा वाद झाला होता. तो राग मनात धरून सोमवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान संदेश याने युवराजला मोबाईलवरून गावातली शाळेजवळ बोलावून घेतले. युवराज तिथे गेला असता त्यावेळी तेथे अमन व सूरज आले. त्यांनी तू आमच्या विरोधात स्टेटस का लावतोस? तुला मस्ती आली आहे काय, असे विचारत युवराजवर चाकूने हल्ला केला. यावेळी युवराजने आरडाओरड केल्याने गावातील नागरिक जमा झाले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. याप्रकरणी संशयित संदेश कोपरकर, अमन मुल्ला, सूरज चौगुले यांच्याविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्यातील एका संशयितास हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांबळे, सुदर्शन कांबळे, अनंत देसाई, गणेश मोरे यांनी पकडले. सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट दिली.