Published on
:
22 Nov 2024, 12:58 am
Updated on
:
22 Nov 2024, 12:58 am
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिटपोल जाहीर होऊ लागताच सट्टाबाजारातही हलचल सुरू झाली आहे. सट्टाबाजारात आता उमेदवारनिहाय भाव देण्यात येऊ लागला आहे. राजेश क्षीरसागर, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर व राहुल आवाडे यांना पसंती आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कागल, कोल्हापूर दक्षिण आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रचंड चुरस असल्याने सट्टाबाजारात उमेदवारांना समान भाव आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकतर्फी वाटणार्या काही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात अतिशय चुरशीच्या बनल्या. त्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ वरच्या स्थानावर राहिला. शेवटच्या दोन दिवसांत राजेश लाटकर यांनी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरीही राजेश क्षीरसागर यांनाच सट्टाबाजारात पसंती राहिली आहे. क्षीरसागर यांना 50 पैसे, तर राजेश लाटकर यांना एक रुपया भाव आहे. सट्टा बाजारात ज्याचा भाव कमी त्याची जिंकण्याची शक्यता अधिक मानली जाते.
कागल मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यात मुश्रीफ यांना सट्टा बाजारात पसंती आहे. त्यांना 40 ते 50 पैसे तर समरजित घाटगे यांना 80 ते 90 पैसे भाव आहे. शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांना सट्टाबाजारात पसंती आहे. कोरे यांना 30 पैसे तर शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील-सरुडकर यांना 50 पैसे भाव आहे. इचलकरंजी मतदारसंघातील भाजपचे राहुल आवाडे यांना 30 पैसे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मदन कारंडे यांना 50 पैसे भाव आहे. शिरोळ मतदारसंघात आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना सट्टाबाजारात पसंती आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातही शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली. सट्टाबाजारात या मतदारसंघातील आ. ऋतुराज पाटील व माजी आमदार अमल महाडिक यांना समान भाव असल्यामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. करवीर मतदारसंघात काँग्रेसचे राहुल पी. एन. पाटील व शिवसेना शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यातील लढत चुरशीची बनल्यामुळे या दोघांनाही समान म्हणजे प्रत्येकी 90 पैसे भाव दिला आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासून आ. आबिटकर यांचे पारडे जड होते; परंतु शेवटच्या टप्प्यात माजी आमदार के. पी. पाटील यांना वातावरण निर्मिती करण्यात यश आल्याने ही लढत अतिशय चुरशीची बनली. त्यामुळे बुकींना देखील या मतदारसंघातील अंदाज येऊ न शकल्यामुळे दोन्ही उमेदवारांना समान भाव दिले आहेत. हातकणंगले विधानसभा मतदार संघातील उमेदवार राजू आवळे व डॉ. अशोकराव माने यांना प्रत्येकी 50 पैसे भाव आहे.
राधानगरी, करवीर व कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांत प्रचंड चुरस असल्यामुळे या तीन मतदारसंघांतील भाव बदलते राहणार आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर या तीन मतदारसंघांतील भावांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होणार आहे.