>>द्वारकानाथ संझगिरी
परवा पर्थ कसोटीत जे घडलं ते अविश्वसनीय होतं. मला अजून प्रश्न पडतो की पर्थ कसोटीत हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवलं हे स्वप्न की सत्य? सत्यात अशी गोष्ट फक्त दाक्षिणात्य सिनेमात घडते. हीरो स्वर्गाच्या अर्ध्या वाटेवर असल्याप्रमाणे जमिनीवर निपचित पडतो. एका क्षणी रक्तबंबाळलेला डोळा उघडतो. त्यात त्याला आई, बायको, मुलगा प्रेयसी किंवा जवळचा दिसतो. तो स्वर्गाच्या रस्त्यावरून असा माघारी फिरतो जणू अमेरिकेहून विमानाच्या फर्स्ट क्लासमध्ये बसून छान शॅम्पेन चाखत चाखत परततोय आणि खलनायकाला दोन क्षणात संपवतो.
हे असं का वाटलं ते सांगतो. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी हिंदुस्थानी संघाने आपल्या अंगणात न्यूझीलंडविरुद्ध सपशेल लोटांगण घातलं होतं. हा एक प्रचंड धक्का होता. वर्षानुवर्षे आपल्या देशात फिरकी गोलंदाजीवर आपला संघ कोणालाही लोळवू शकतो. हा अभिमान आणि आत्मविश्वास तळलेल्या पापडासारख्या कडाकडा तुटला. त्यानंतर अनेकांनी ऑस्ट्रेलियन दौऱ्याचा एक्झिट पोल जाहीर करून टाकला. कुणी म्हणाला, हिंदुस्थान 5-0 ने हरेल. 4-0 ने हरेल. अगदीच आशावादी 3-1 हरण्यावर थांबले. पण सारे अंदाज, सारे पोल फेल ठरले. तिथे गेल्यावर हिंदुस्थानी संघासाठी एकही सरावाची मॅच नव्हती आणि समोर विकेट पर्थची. म्हणजे जगातली सर्वात वेगवान खेळपट्टी.
पर्थवर बुमराने टॉस जिंकला आणि फलंदाजी घेतली. हिरवळ खेळपट्टीवर उसळणारे चेंडू पाहून अनेकांनी जसप्रीत बुमरा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पहिल्या दिवशी दुपारपर्यंत हिंदुस्थानी संघ दीडशेत कोसळला. त्यातल्या त्यात तीन फलंदाजांनी लढण्याचा प्रयत्न केला. एक रेड्डी, दुसरा पंत आणि तिसरा राहुल (राहुलला तिसऱ्या पंचांनी कानाला धरून बाहेर काढलं नसतं तर त्याची लढत अधिक वाढली असती).
चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बालपणापासून बागडत असतात. त्यामुळे ते आरामात धावा करतील अशी अनेकांनी समजूत करून घेतली होती. काही चाहत्यांनी तर मनातल्या मनात शरणागती लिहून दिली होती आणि बघता बघता प्रचंड शरीराचा एक घटोत्कच कौरव सैन्यावर पडला. तसा हिंदुस्थानी संघ ऑस्ट्रेलियन संघावर कोसळला. ऑस्ट्रेलियन संघाने कशीबशी 100 ही धावसंख्या ओलांडली आणि दुसऱ्या डावात हिंदुस्थानी फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चटणी केली. पुढे ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात ज्या धावांची गरज होती त्या काढण्यासाठी ऑस्ट्रेलिया पर्थच्या खेळपट्टीऐवजी पर्थ विमानतळाच्या रन वेवर खेळली असती तरीही जिंकली नसती.
जे घडलं तो चमत्कार होता? की त्यामागे काही लॉजिकल कारण होतं. बदललेल्या खेळपट्टीच्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही. त्यात माझा अभ्यास नाही. काही तज्ञांचं असं मत होतं की तिथलं ऊन आणि तिथला गुढ रम्य वारा यांनी खेळपट्टीचे हिरवे कपडे खाकी केले. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजी का कोसळली? याचा मला अंदाज असा आहे. टी ट्वेंटी क्रिकेटचा फायदा आणि तोटा आपल्या क्रिकेटला झाला तसा त्यांच्या क्रिकेटलाही झाला. टी-20 ची मूळ मैदानं छोटी झाली. फटके मारण्याची उत्कटता वाढली आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे तंत्र हळूहळू बदलत गेले.
एकेकाळी ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे पदलालित्य हे बेले डान्ससारखं असायचं. पॉपिंग क्रीज आणि पुढे एखाद् दोन यार्ड हे त्याचं स्टेज होतं. पुढचा चेंडू पुढे आणि मागचा चेंडू मागे हे मूलभूत त्यांचा उसळत्या खेळपट्टीवरही थाटलेलं असायचं. टी- 20, वन डेने ते नृत्य कौशल्य कमी केलं. फलंदाज फ्रंटफूटवर पूल, हूक करायला लागले. कारण तिथे नियम वेगळे असतात. या सवयी फलंदाजांच्या अंगाशी येतात. दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुस्थानची वेगवान गोलंदाजी ही पक्षी मारण्याची छऱ्याची बंदूक राहिलेली नाही. हिंदुस्थानकडे आधुनिक बंदुका आहेत आणि त्यात बुमरा म्हणजे क्षेपणास्त्र. त्याच्या डोक्यात जो विचार येतो तो चेंडूंत फिड करतो आणि गुलामाने ऐकावं तसा चेंडू त्याचं ऐकतो. त्यामुळे बहुतांश वेळा त्याला हवा तो वेग, टप्पा आणि दिशा मिळते. त्यात त्याचा जो स्विंग आहे, त्याची जी ऍक्शन आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. त्याने टाकलेला चेंडू किंचित येताना आत येतो आणि तसाच पुढे जातो किंवा कधीतरी रस्ता बदलून सरळ जातो. त्यामुळे फलंदाजांना त्याला खेळणं कठीण असतं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने यापुढे हिंदुस्थानी संघासाठी कशा खेळपट्टय़ा बनवाव्यात हे विचारपूर्वक ठरवावे. पूर्वीच्या इसापनीतीमधली कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आता बदलली आहे. करकोच्याच्या भांडय़ातलं खाणं कोल्हा खाऊ शकतो. कारण त्याच्याकडे आता ताकदवान स्ट्रॉ आहे. पण तरी एक सांगावसं वाटतं, पुन्हा नवा एक्झिट पोल तयार करू नका. अलीकडे एक्झिट पोल चुकीचे ठरतात.
बसा आणि मस्त मॅच एन्जॉय करा.