उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिशन ग्राऊंड मैदानावर सांगता सभेत उपस्थितांशी संवाद साधला.
Published on
:
18 Nov 2024, 2:58 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:58 pm
बारामती : माझ्याविरोधात घरातील कोणी उभे राहिले तर तो त्यांचा अधिकार आहे. प्रतिभा काकी (शरद पवार यांच्या पत्नी) मला आईसारख्या आहेत. पण, त्यांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या बातम्या पसरवल्या जातात. माझा विरोधक असला तरी मी त्याचे काम मार्गी लावतो. मग घरातल्यांबाबत असे होईल का. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन सहानुभूती मिळवू नका, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (दि.१८) शरद पवार गटावर केली.
बारामतीतील मिशन हायस्कूल मैदानावर महायुतीचे उमेदवार अजित पवार यांची सांगता सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधी उमेदवार युगेंद्र यांच्यावर टीका करताना शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांच्यावर थेट टीका करणे टाळले.
अजित पवार म्हणाले, मला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. पण, आता आईसह बहिणी माझ्यासोबत आहेत. माझी मुले माझ्यासोबत आहेत. माझी पत्नी लोकसभेला पराभूत झाली. तिला मी राज्यसभा दिली, ती सुद्धा माझ्या प्रचाराची जबाबदारी सांभाळते आहे. बारामतीकर हेच माझे कुटुंब आहे. विरोधक भावनिक करतात, त्यांना सडेतोड उत्तर द्या. कोणाला घाबरण्याचे कारण नाही. फक्त आपल्याकडून काही चूक होऊ देऊ नका. तुमच्यावर कोणी दबाव आणत असेल तर अजित पवार तुमच्या पाठीशी आहे, असे ते म्हणाले.
१९६७ ते १९९० या काळात येथे शरद पवार नेतृत्व करत होते. त्यानंतर मी नेतृत्व करू लागलो. परंतु साहेबांच्या, माझ्या काळात कधीही लोक पैसे देऊन आणावे लागले नाहीत. पण, आता सभेला आणलेल्या महिला टीव्हीसमोर आम्हाला पैसे दिले नाहीत, चहा-पाणी नाही, असे सांगत आहेत. ५०० रुपये देऊन महिला आणल्या जात आहेत. ही पद्धत बारामतीत कधी नव्हती. या सवयी झेपणाऱ्या नाहीत. तुम्हाला नादच करायचा असला तर मग मी पण पुरून उरेन, असे आव्हान अजित पवार यांनी युगेंद्र यांना दिले.
अजित पवारला मत म्हणजे भाजपला मत असा प्रचार काहींकडून केला जात आहे. मला मत म्हणजे ते राष्ट्रवादीला पर्यायाने महायुतीला मत असेल, असे स्पष्ट करून अजित पवार म्हणाले, तुम्ही शिवसेनेसोबत जायचा निर्णय घेतला होताच ना. मी आजवर शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या खूप सांगता सभा बघितल्या, पण आजच्या या सभेला झालेली गर्दी ही रेकाॅर्डब्रेक असल्याचेही ते म्हणाले. विरोधक ४० वर्षांपूर्वीचे काढत बसलेत. तुम्ही उद्या काय करणार हे सांगा, असा सवाल पवार यांनी केला.
बारामतीला देशात पहिल्या क्रमांकावर नेणार
माझा नाद करू नका. मी कामाचा माणूस आहे. माझ्यापूर्वी शरद पवार प्रतिनिधित्व करत होते. मी राजकारणात आल्यावर माझी थेट त्यांच्या कामाशी तुलना होणार या विचाराने माझी झोप उडाली, तेव्हापासून विकासकामे करत आलो आहे. माझा आताही कोणी नाद करू शकत नाही. आज राज्यात बारामतीचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जात आहे. उद्याच्या पाच वर्षात देशात बारामती हे प्रथम क्रमांकावर असेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. बारामती शहर, तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला.