Published on
:
05 Feb 2025, 1:30 am
Updated on
:
05 Feb 2025, 1:30 am
कोल्हापूर : फुलेवाडीतील बोगस डॉक्टरला गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणार्या गंगावेश येथील दत्त मेडिकलच्या मालकाला जुना राजवाडा पोलिसांनी मंगळवारी गजाआड केले. मेडिकल चालक योगेश शंकर निगवेकर (वय 42, रा. गंगावेश, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. फुलेवाडीतील बोगस डॉक्टर दगडू बाबूराव पाटील याच्याशी असलेले कनेक्शन उघड होताच पोलिसांनी ही कारवाई केली.
बेकायदा गर्भलिंग निदान व गर्भपातप्रकरणी आजवर अटक झालेल्यांची संख्या पाचवर झाली आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. संशयिताला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संशयित योगेश निगवेकरला गोळ्यांचा पुरवठा करणारा कोण आहे, याची सखोल चौकशी सुरू असल्याचेही तपास अधिकार्यांनी सांगितले. संशयिताला लवकर जेरबंद करण्यात येईल, असे ते म्हणाले.
मेडिकल दुकानातून बोगस डॉक्टरला गर्भपात करण्याच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने फुलेवाडी, जुना बुधवार पेठ आणि जोतिबा डोंगर येथे छापे टाकून तपासणी केली होती. 20 डिसेंबरला झालेल्या कारवाईत बोगस डॉक्टर दगडू पाटील व त्याच्या चार साथीदारांना अटक झाली होती. संशयिताच्या चौकशीतून गंगावेश येथील दत्त मेडिकलचा मालक योगेश निगवेकर याने गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला होता. जुना राजवाडा पोलिसांनी निगवेकरला मंगळवारी सकाळी घरातून अटक केली. संशयिताने शहर व जिल्ह्यातील आणखी किती बोगस डॉक्टरांसह गरजूंना गोळ्यांची विक्री केली, याचीही त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येणार आहे, असेही संजीव झाडे व उपनिरीक्षक संतोष गळवे, महेश पाटील यांनी सांगितले.