चांदिवली मतदारसंघात शिवसेनेकडून निवडून आलेल्या आमदाराने केवळ माझ्याशीच नाही, तर मतदारांशी गद्दारी केली आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरच्या निवडणुकीत गद्दाराला गाडून चांदिवलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नसीम खान यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीचे चांदिवलीचे उमेदवार मोहम्मद आरीफ नसीम खान यांच्या प्रचारार्थ प्रचार कार्यालयाला भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. चार दिवसांपूर्वी तुमच्या कार्यालयात एक गुंड शिरला होता. त्या गुंडाला सांगा, तुझी गुंडगिरी आम्ही पाहिली आहे. पुढच्या आठवडय़ात तू रस्त्यावर येशील. कारण आता महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागला तर याद राख, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसैनिक मागून वार करीत नाही. उघड वार करतो, असेही ते म्हणाले. इथला गद्दार मी वर्षा निवासस्थान सोडत असताना रडून रडून सांगत होता की, मी आपल्याला सोडून जाणार नाही. मात्र दुसऱयाच दिवशी त्याने गद्दारी करून पळून गेला. जे नामर्द होते ते गेले. आता राहिलेत ते सर्व मर्द आहेत. या ठिकाणी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, आरपीआय, बौद्ध समाजाचे झेंडे दिसत आहेत. सगळेच महाविकास आघाडीसोबत आहेत. या निष्ठावंतांमुळे नसीम खान यांचा विजय निश्चित असल्याचेही ते म्हणाले. तुम्ही आमदार तर होणारच; मात्र आमदार झाल्यानंतर यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवा, असे आवाहनही त्यांनी केले.