गरोदर पत्नीचा मारहाण करून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप:हिंगोली न्यायालयाचा निकाल, सवना तांडा येथील घटना

2 hours ago 1
सेनगाव तालुक्यातील सवना तांडा येथे ऊसतोडीची उचल फेडण्यासाठी माहेरावरून १० हजार रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून गरोदर पत्नीला मारहाण करून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप व १० हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एन. माने-गाडेकर यांनी बुधवारी दिला आहे. याबाबत सहाय्यक सरकारी वकील अ‍ॅड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवनातांडा येथे अर्चना दीपके यांना सासरची मंडळी ऊस तोडीची उचल फेडण्यासाठी माहेरावरून १० हजार रुपये आणण्याची मागणी करीत होती. त्यानंतर ता. २२ ऑक्टोबर २०१५ रोजी रात्री अर्चना ह्या सात महिन्याची गरोदर असतांनाही त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सखुबाई धवसे यांनी ता. २३ ऑक्टोबर रोजी गोरेगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयत अर्चना यांचा पती कचरू धवसे याच्यासह इतर पाच जणांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अधिक तपास करून हिंगोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी कचरू उर्फ रंगनाथ दीपके यास जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर उर्वरीत पाच जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. एस. डी. कुटे, ॲड. एस. एस. देशमुख यांनी सहकार्य केले. जमादार पी. ए. मार्कड यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article