Published on
:
28 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:35 pm
हॉस्टन : गाढ झोप लागली, पूर्ण झोप झाली की आपण पूर्ण ताजेतवाने होतो, असेच आजवर सांगितले गेले आहे आणि सकृतदर्शनी स्वानुभव देखील असाच असू शकतो. मात्र, राईस युनिव्हर्सिटी व हॉस्टन मेथडिस्ट सेंटर फॉर न्यूरल सिस्टीम्स रिस्टोरेशन अँड वेईल कॉर्नल मेडिकल कॉलेजने केलेल्या अभ्यासात मात्र गाढ नव्हे तर हलक्या झोपेने आपला मेंदू अधिक सक्रिय राहतो, मेंदूची आकलनक्षमता वाढते, असे आढळून आले आहे. हलक्या झोपेमुळे मेंदूला अधिक ऊर्जा लाभते आणि याचे प्रतिबिंब आपल्या एकंदरीत वर्तणुकीत उमटत राहते, असे यात नमूद आहे.
गाढ झोपेऐवजी हलकी झोप घेतल्यास यामुळे ब्रेन सिंक्रोनायझेशन उत्तम प्रकारे होते आणि यामुळे इन्फॉर्मेशन कोडिंगदेखील अधिक सरसपणे होते, असा संशोधकांचा दावा आहे. इनव्हॅझिव्ह स्टिम्युलेशनचा देखील यात बराच फरक पडतो, असे यात दिसून आले असल्याचे ते सांगतात. या शोधामुळे निद्रानाश व अन्य तत्सम आजारांवर उपचार पद्धतीत देखील काही फरक करता येऊ शकतो का, यावर सध्या अधिक अभ्यास सुरू आहे. मल्टिइलेक्ट्रोड अॅरेजचा वापर करत संशोधकांनी मेंदूच्या तीन क्षेत्रांत असलेल्या हजारो न्यूरॉन्सवर अभ्यास केला. यात प्रायमरी, मिड लेव्हल व्हिज्युअल कॉर्टिसेस व डॉर्सोलेटरल प्रेफंटल कॉर्टेक्सचा समावेश होतो. याचा व्हिज्युअल प्रोसेसिंग व एक्झक्युटिव्ह फंक्शन्सशी थेट संबंध येतो. झोपेपूर्वी व झोपेनंतर न्युरॉन्स कसे अधिक सक्रिय राहतात, यावर या संशोधनात भर देण्यात आला.