गुहागर : गुहागर विधानसभेसाठी मतदान केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी.pudhari photo
Published on
:
21 Nov 2024, 12:00 am
Updated on
:
21 Nov 2024, 12:00 am
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 49 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदान मंदगतीने चालू होते. मात्र, दुपारनंतर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती.
गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी 322 मतदान केंद्रासाठी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली. गुहागर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 42 हजार 704 मतदार असून यात पुरुष 1 लाख 15 हजार 511 तर महिला 1 लाख 27 हजार 193 मतदार आहेत. गुहागरमध्ये पुरुष 46 हजार 593 तर महिला 55 हजार 252 खेडमध्ये पुरुष 34 हजार 55, महिला 35 हजार 454, चिपळूण 34 हजार 863 पुरुष तर 36 हजार 487 महिला मतदार आहेत. गुहागर विधानसभेसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
गुहागर विधानसभा मतदारसंघात ‘उबाठा’चे विद्यमान आमदार भास्कर जाधव तसेच शिवसेनेचे राजेश बेंडल यांच्यात लढत आहे. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद सीताराम गांधी (रेल्वे इंजिन), उबाठा शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव (मशाल), शिवसेनेचे राजेश रामचंद्र बेंडल (धनुष्यबाण) या मान्यताप्राप्त पक्षांसह नोंदणीकृत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमोद परशुराम आंब्रे (ऑटो रिक्षा), अपक्ष उमेदवार संदीप हरि फडकले (बॅट), मोहन रामचंद्र पवार (शिट्टी) आणि सुनील सखाराम जाधव (अंगठी) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.(Maharashtra assembly poll)
मतदारांना घेऊन येणार्या काही गाड्या अचानक काही कारणास्तव रद्द झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. यामुळे त्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही तर अनेक गाड्या मुंबई येथून उशिरा सुटल्याने वाहतुकीची कोंडी झाली.