गेल्या वर्षी कांद्यापेक्षा टोमॅटो भाव खाऊन गेला होता. यामध्ये राज्यातील जुन्नर तालुक्यातील शेतकर्यांना टोमॅटोचा सोन्यासारखा भाव मिळाला होता. अनेक शेतकर्यांनी लाखो रुपये कमावले होते. पण यंदा टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दुसरीकडे अनेक जिल्ह्यांतील कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेने कापसाला घरात ठेवले आहे. हा कापूस आता काळवंडत असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागला आहे. शेतकऱ्यांनी सरकारला योग्य मदत करण्याची मागणी केली आहे.
जुन्नरचा टोमॅटो मातीमोल
जुन्नरच्या नारायणगाव बाजार समितीत टोमँटोलाला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्यांच्या मेहनतीचा चिखल झाला आहे. उत्तर भारतात सर्वाधिक निर्यात होणाऱ्या टोमँटोचे सर्वाधिक उत्पादन जुन्नर ,आंबेगाव ,शिरुर आणि खेड तालुक्यात होत आहे. गेल्या वर्षी टोमँटोने शेतकर्यांना चांगली कमाई करुन दिली होती.
हे सुद्धा वाचा
5 रुपये किलोचा भाव
मात्र यंदा टोमँटोला 5 ते 10 रुपये प्रतिकिलो बाजार मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. टोमँटोचे दर अचानक कोसळल्याने उत्पादन खर्च सोडाच वाहतूक खर्चही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचे पीक घेतले. पण आता दर कोसळल्याने त्यांच्यासमोर संकट उभं ठाकलं आहे.
भाववाढीच्या प्रतिक्षेत कापूस घरातच
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात अनेक शेतकर्यांनी मकर संक्रांतीनंतर भाव वाढेल या आशेपोटी हजारो क्विंटल कापूस घरातच साठवून ठेवला. मात्र या शेतकर्यांना हमी भावापेक्षा 400 ते 500 रुपये कमी दराने खाजगी व्यापार्यांना हा कापूस विकावा लागत आहे. कमी भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सीसीआय खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी अतिशय धिम्या गतीने असल्यामुळे शेतकरी खाजगी व्यापार्यांना कापूस विकत आहे. दरम्यान अनेक दिवसापासून साठवून ठेवलेल्या कापसामुळे अंगाला खाज सुटत आहे. शिवाय कापूस ही काळा पडत असल्याने मिळेल त्या भावात त्याची विक्री करण्यात येत आहे.
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले
धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या अहवालानंतर 2024 च्या पहील्या टप्प्यातील अतिवृष्टी अनुदान जिल्ह्यातील 1 लाख 80 हजार शेतकर्यांना मंजूर झाले होते. त्यासाठी 221 कोटी 81 लाख रुपये निधीची गरज होती. सरकारने या निधीची 10 डिसेंबर रोजी तरतूद केली होती. शेतकर्यांनी केवायसी करुनही तीन आठवडे झाले तरी अनुदान मिळत नव्हते. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.