Published on
:
21 Nov 2024, 5:39 am
Updated on
:
21 Nov 2024, 5:39 am
Pimpri News: मावळ विधानसभा मतदारक्षेत्रात मतदान प्रक्रिया सुरू असताना गोंधळ करण्याच्या तयारीत असलेल्या 105 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, परिमंडळ तीनच्या हद्दीतही 33 तरुणांना पोलिसांनी दिवसभर डांबून ठेवले होते. पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे किरकोळ अपवाद वगळता कोठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद रात्री उशिरापर्यंत नव्हती.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारीत भोसरी, पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यातील भोसरी आणि मावळ मतदारसंघ डोकेदुखी ठरणार असल्याची कुणकुण पोलिसांना होती. त्या अनुषंगाने संबंधित मतदारसंघामध्ये पोलिसांनी आवश्यक फौजफाटा तैनात केला होता. यासह गोपनीय शाखेचे पोलिसही माहिती संकलित करण्यासाठी पहाटेपासूनच हद्दीमध्ये फिरत होते.
दरम्यान, मतदानप्रक्रिया सुरू असताना काहीजण विरोधी उमेदवाराच्या कुरघोड्या करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच, काहीजण नियमभंग करून पोलिसांशीच अरेरावी करत होते. तर, काही मतदारांना एकत्रित करून आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत होते. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सर्व बाबींचा विचार करून संबंधितांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लगेचच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मतदानप्रक्रिया संपल्यानंतर त्यांना रात्री उशिरा सोडून देण्यात आले.