>> मंगेश मोरे
गोरेगावकरांनी मागील दहा वर्षांत भाजपला दोनदा संधी दिली, मात्र राज्य व केंद्रात भाजपचे सरकार असूनही विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांनी मतदारांचा अपेक्षाभंग केला. दहा वर्षांत ‘जैसे थे’ राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी गोरेगावकरांनी यंदा परिवर्तनाचा निर्धार केला आहे. हे परिवर्तन शिवसेनेचे डॅशिंग उमेदवार समीर देसाई यांच्या रूपात दिसण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण व दांडगा जनसंपर्क असलेले समीर देसाई यांनी विकासाचा ‘हुकमी एक्का’ हाती घेत विद्या ठाकूर यांच्या विजयाची हॅटट्रिक रोखण्याची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे येथील चुरस रंगतदार ठरणार आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला गोरेगाव मतदारसंघ आहे. जवाहर नगर, राम मंदिर, सिद्धार्थ नगर, मोतीलाल नगर, बांगूर नगर, उन्नत नगर आदी विभागांचा समावेश होतो. गोरेगाव स्थानकाच्या पूर्वेचा काही भाग या मतदारसंघात मोडतो.
समीर देसाई 22 वर्षे जनसेवेत
समीर देसाई हे 2002-07, 2007-12 आणि 2017-22 या अवधीत मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्यापैकी तीन वर्षे बेस्ट समिती, तर सात वर्षे स्थायी समितीचे सदस्य राहिले. त्यांनी रस्ते, पिण्याचे पाणी, नाल्याचे काम, थीम पार्क, एसआरए प्रकल्प, धार्मिक स्थळांची पुनर्बांधणी आदी कामे केली आणि जनसेवेत सदैव तत्पर म्हणून ओळख बनवली.
निष्ठावंतांचे गोरेगाव
जून 2022मध्ये शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली. त्या वेळी गोरेगावच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेनेची साथ सोडली नाही. मतदारसंघात मराठी, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, मुस्लीम मतदारांचा शिवसेनेला वाढता पाठिंबा मिळत आहे. विद्या ठाकूर यांनी परिसरातील प्रश्नांबाबत विधानसभेत आवाज न उठवल्याची नाराजी मतदार व्यक्त करतात.
शिवसेनेचे पारडे जड
शिवसेनेचे नेते, माजी मंत्री सुभाष देसाई यांनी तीन वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1990 ते 2009 दरम्यान विधानसभा निवडणुकांत शिवसेनेचे उमेदवार मोठय़ा मताधिक्याने जिंकले. 2014पर्यंत हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. दहा वर्षांनंतर शिवसेनेने भाजपला घेरून बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याची जोरदार तयारी केली आहे. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असल्यामुळे येथे शिवसेनेची मशालच धगधगणार असल्याचे बोलले जात आहे.
मतदारसंघातील समस्या
पुनर्विकासासाठी सिद्धार्थ हॉस्पिटल बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. टोपीवाला मंडई व नाटय़गृहाच्या कामाची रखडपट्टी आहे. त्याचबरोबर मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, भगतसिंग नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर येथील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आहे. पावसाळ्यात सिद्धार्थ नगर, मोतीलाल नगर या भागात पाणी तुंबते. गोरेगाव पूर्वेकडील घासबाजारचा प्रश्न प्रलंबित आहे. एमएमआरडीएने जवळपास 2000 कुटुंबांचे गोरेगावमध्ये पुनर्वसन केले. त्यांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे पादचाऱयांना चालणे मुश्किल होत आहे.