Published on
:
22 Jan 2025, 12:11 am
Updated on
:
22 Jan 2025, 12:11 am
सध्या देशामध्ये महाकुंभमेळ्यामुळे सर्वत्र पवित्र वातावरण आहे. महाकुंभाच्या पहिल्या पर्वात सुमारे चार कोटी लोकांनी गंगा नदीमध्ये स्नान केलेले आहे. गंमत अशी की, जगातील कित्येक देशांची लोकसंख्या सुद्धा चार कोटी नाही. जगातील आपल्या महान एकमेव देशात गंगास्नान करून आपले पाप अक्षरशः करोडो लोक धुवून घेत आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे.
यावर्षीच्या महाकुंभमेळ्याला ग्लॅमर लाभलेले आहे असे तुमच्या सहज लक्षात येईल. कित्येक सुंदर तरुणींनी साध्वी होण्यासाठी प्रशिक्षण घेतले आणि गंगेत उडी टाकून त्या साध्वी झाल्या. आध्यात्मिक बाबींचे आकर्षण असणारी ही मोठी जनता या देशामध्ये आहे, हे नवलच म्हणावे लागेल. अशाच प्रकारचे ग्लॅमर आयआयटी बाबा यांनीही महाकुंभमेळ्याला मिळवून दिले आहे. हे बाबा आयआयटी पदवीधर असून कॅनडामध्ये लाखो रुपयांची नोकरी करत होते. अचानक एके दिवशी नोकरी सोडून ते संन्यस्त झाले आणि साधूचे जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. कित्येक वर्षे केलेल्या तपश्चर्येचे तेज त्यांच्या चेहर्यावर दिसत असल्यामुळे सहाजिकच पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली. बाबांनी आपल्या आयुष्याचा जीवनपट देशासमोर खुला केला आणि महाकुंभमेळ्याला एका वेगळ्या उंचीवरून नेऊन ठेवले. कॅनडामधील लाखो रुपयांची नोकरी करून जे नाव आयआयटीबाबाला मिळाले नसते, ते नाव नागासाधू होऊन त्यांना त्यांना सहजच मिळाले आणि ते जगभरामध्ये विख्यात झाले.
आपण सर्वसामान्य लोकांना असे काही करता येत नसते. आपल्यावर संसाराची जबाबदारी असते. मुलाबाळांचे शिक्षण, स्वतःची नोकरी आणि एकंदरीत समाजामध्ये चांगले स्थान यासाठी आपण आयुष्यभर संघर्ष करत असतो. संन्यस्त जीवन जगणार्या लोकांवर अशी कोणतीही जबाबदारी नसते. त्यामुळे चिलमीचा धूर काढीत आणि आकाशस्थ देवतांकडे पाहत ते आपले आयुष्य सहजपणे व्यतीत करत असतात. संसारी माणसांना या नागा साधूंच्या आणि कुंभमेळ्यातील संतांच्या जगण्याची असूया वाटली, तर त्यात काही वावगे नाही. महिनाअखेरीला संपत आलेले गोडेतेल आणि साखर कशी पुरवायची, ही विवंचना एकीकडे आणि चिलमीतून धूर काढण्यासाठी पदार्थ कसे मिळवायचे, ही विवंचना दुसरीकडे, अशी ही दोन टोके आपल्या देशात आहेत. आपण आपले झेपेल तेवढे अध्यात्म करावे आणि एकाच वेळी प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधण्याचा प्रयत्न करावा एवढेच आपल्या सामान्यजनांच्या हाती असते.
संसारामध्ये आधीच गुरफटून गेलेल्या लोकांनी तर बाबा होण्याचा विचारसुद्धा मनात येऊ देऊ नये. भवसागर पार करताना जो काही त्रास होत असेल, तो निमूटपणे सोसावा. अन्यथा रातोरात घरातून फरार होऊन कुंभमेळ्यात जाऊन चिलमीचा धूर काढत बसाल, तर तुमची पत्नी आणि मुलेबाळे, आई-वडील आणि सासू-सासरे तुम्हाला शोधत तिथे येतील आणि हाताला धरून पुन्हा घरी घेऊन जातील, हे निश्चित आहे. महाकुंभमेळ्याचे आकर्षण वाटणार्या संसारी स्त्री-पुरुषांना आम्ही सावधगिरीचा इशारा देत आहोत, हे कृपया सर्वांनी लक्षात घ्यावे. जगभरातील अनेक सेलिबि—टी या महाकुंभमेळ्यात सहभागी झाल्याने त्याला खर्याअर्थाने ग्लॅमरस रूप मिळाले आहे.