बेळगाव : कित्तूर राणी चन्नम्मा सोसायटीच्या कार्यालयाला टाळे ठोकताना उपस्थित महसूल उपायुक्तरेश्मा तालिकोटी, अनुराधा तापसी आदी.Pudhari File Photo
Published on
:
28 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:46 pm
बेळगाव : महापालिकेने थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. एक लाखाच्या वर ज्यांची थकबाकी आहे, अशा आस्थापनांना टाळे ठोकण्यात येत आहेत. गोंधळी गल्ली येथील कित्तूर राणी चन्नम्मा सहकारी सोसायटीने सहा लाखांचा कर थकवला असल्यामुळे गुरुवारी (दि. 28) सोसायटीला टाळे ठोकण्यात आले; तर कॉलेज रोडवरील हॉटेलला कर जमा करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली.
महापालिकेच्या महसूल विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून ज्यांची एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. आज सकाळी महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कित्तूर चन्नम्मा सोसायटीला टाळे ठोकले. जोपर्यंत कर भरण्यात येत नाही. तोपर्यंत टाळे खोलण्यात येणार नाहीत. ही सोसायटी राजकीय नेते व्ही. एस. साधुण्णावर यांची आहे. त्यामुळे या कारवाईची चर्चा रंगली होती.
महापालिकेच्या पथकाने त्यानंतर आदर्श हॉटेलच्या व्यवस्थापनाला थकीत आठ लाख रुपये भरण्याबाबत सूचना केली. व्यवस्थापनाने पाच लाख 30 हजार रुपयांचा धनादेश दिला. उर्वरित रक्कम जमा करण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली. लवकरात लवकर थकीत कर भरण्याची सूचना करण्यात आली. महापालिका आयुक्त शुभा बी. यांच्या सूचनेनंतर थकीत कर वसुलीला वेग आला आहे. आतापर्यंत अनेक दुकानांना टाळे ठोकण्यात आले असून थकित मालमत्ता करधारकांनी वेळेत कर भरणा करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
डीसीसी बँकेकडे 20 लाख थकित
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँककडे मालमत्ता कराची 20 लाखाहून अधिक रक्कम थकीत आहे. त्यामुळे आज पुन्हा महसूल अधिकार्यांनी व्यवस्थानाशी चर्चा केली. त्यावेळी लवकरात लवकर कर भरण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे पथक माघारी फिरले.