‘ब्लॅक पँथर 2.0’ रोबो चीनने बनवला Pudhari File Photo
Published on
:
04 Feb 2025, 12:00 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:00 am
बीजिंग : चीनमधील संशोधकांनी आता एक वेगवान असा चार पायांचा रोबो विकसित केला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अशा चार पायांच्या रोबोंच्या तुलनेत तो अधिक वेगाने धावू शकतो. त्याचा वेग सर्वसामान्य माणसापेक्षाही अधिक असू शकतो. जगातील सर्वात वेगवान धावपटू अशी ज्याची ख्याती आहे त्या उसेन बोल्टची बरोबरी करील इतका या रोबोचा वेग असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रोबोला ‘ब्लॅक पँथर 2.0’ असे नाव देण्यात आले आहे.
हा रोबो म्हणजे ‘मिरर मी’ आणि झेजियांग युनिव्हर्सिटीतील ‘सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी मेकॅनिक्स’ मधील संशोधकांचा संयुक्त प्रकल्प आहे. त्याचे वजन 84 पौंड म्हणजेच 38 किलो असून उंची 2.1 फूट आहे. तो केवळ दहा सेकंदांमध्ये 100 मीटरचे अंतर कापू शकतो. त्याचा कमाल वेग 10.4 मीटर प्रति सेकंद इतका असल्याचा दावा त्याची निर्मिती करणार्या संशोधकांनी केलेला आहे. उसेन बोल्टने 2009 वर्ल्ड चॅम्पियनशीप्समध्ये नोंदवलेला वेग 10.44 मीटर प्रति सेकंद असा आहे. त्यापेक्षा थोडा कमी हा वेग आहे. या रोबोला वेगाने धावता यावे यासाठी त्याच्या चारही पायांमध्ये लवचिक, गुडघ्यासारखे सांधे बनवण्यात आले होते. वेगाने धावत असताना रोबोला त्याच्या वजनाचे संतुलन साधता यावे यासाठी कार्बन-फायबरची संरचना बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रोबोमध्येही ‘एआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर केला आहे. त्यामुळे हा रोबो आजूबाजूच्या परिस्थितीला अनुकूल अशा गोष्टी शिकून घेतो. मशिन लर्निंगची ही क्षमता त्याला धावण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी उपयुक्त ठरते. या रोबोमध्ये इतक्या वेगाची क्षमता का निर्माण करण्यात आली, हे मात्र अद्याप गुुलदस्त्यातच आहे. ‘डीप रोबोटिक्स लिंक्स’सारखे असे अन्य चार पायांचे रोबो हे सुरक्षेसाठी तसेच दुर्गम भागातील निरीक्षणासाठी बनवण्यात आले होते; मात्र त्याचा वेग केवळ 4.9 मीटर प्रति सेकंद इतका आहे. 2012 मध्ये बोस्टन डायनॅमिक्सने ‘चिताह रोबो’ विकसित केला होता. त्याचा वेग 12.6 मीटर प्रति सेकंद होता.