Published on
:
28 Nov 2024, 11:45 pm
Updated on
:
28 Nov 2024, 11:45 pm
बीजिंग : चीनच्या संशोधकांनी हॉलीवूड चित्रपट स्टार वॉर्समधील ‘डेथ स्टार’पासून प्रेरणा घेत बीम अस्त्र तयार केल्याचा दावा केला आहे. सदर चित्रपटात डेथ स्टारची संकल्पना दाखवण्यात आली, ती आठ वेगवेगळ्या लेजर बीम अर्थात किरणांना जोडून तयार केली आहे. चित्रपटात या महाशक्तिशाली किरणांमुळे शत्रूंवर केवळ हल्लाच करता येतो असे नव्हे, तर त्यांच्या ग्रहाचाच संपूर्ण नायनाट केला जातो, असे दर्शवले गेले आहे. लाईव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, चीनने सदर अस्त्र तयार केले असून, हायपॉवर इलेक्ट्रोमॅग्निक किरणांना जोडत नव्या पद्धतीची मायक्रोवेव किरणे तयार होऊ शकतात, अशी याची रचना आहे.
‘डेथ स्टार’सारखी ही घातक अस्त्रे वेगवेगळ्या गाड्यांवर तैनात केली जातात आणि ते गाडे वेगवेगळ्या दिशांना किरणांचा मारा सुरू करतात. त्यांना सिंक्रोनाईज करत शत्रूंवर हल्ले चढवले जातात. बीम शस्त्रांच्या यापुढील वाटचालीतही अनेक तांत्रिक व व्यावहारिक आव्हाने असणार आहेत, हे मात्र लक्षवेधी आहे. उच्च ऊर्जा स्त्रोतासह सिस्टीमची दक्षता आणि बीमने अचूक वेध घेणे यात निर्णायक असणार आहे. चीनच्या मॉडर्न नेव्हिगेशन जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, अनेक आव्हाने असताना देखील चीन या आघाडीवर उत्तम प्रगती करत आहे. भविष्यात बीम अस्त्रांचा वापर शक्य असून, या पार्श्वभूमीवर हा शोध युद्धादरम्यान विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. बीम अस्त्रांमुळे लेसर, मायक्रोवेव किंवा अन्य प्रकारच्या ऊर्जेला केंद्रित करून एकाच दिशेने धाडता येते. या ऊर्जेचा विनियोग लक्ष्यभेद करताना ते पूर्णपणे निकामी करण्यासाठीही होऊ शकतो. अर्थातच, हे तंत्र मॅनेज करणे हे अतिशय आव्हानात्मक आहे. तरीही त्यात आपल्याला पूर्ण यश मिळाल्याचा चिनी संशोधकांचा दावा आहे.